`जे हवं ते करा आम्हीही तयार आहोत` भाजपच्या इशाऱ्याला संजय राऊत यांचं उत्तर
काँग्रेस, शिवसेनेपेक्षा मोठा पराभव भाजपचा झाला आहे - संजय राऊत
मुंबई : चार राज्यातील दणदणीत विजयानंतर आता राज्यातील भाजपा नेत्यांकडून 'मिशन महाराष्ट्राची' घोषणा करण्यात आली आहे. 'युपी झांकी है, महाराष्ट्र बाकी है' अशा घोषणा देत भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. आम्हाला मुंबई कोणत्या पक्षापासून मुक्त करायची नाही. तर आम्हाला मुंबईला भ्रष्ट्राचाराच्या विळख्यापासून मुक्त करायचे आहे, मुंबईत प्रचंड विजय आणि महाराष्ट्रात भाजपचं पूर्ण बहुमताचं सरकार तयार करण्याकरीता सज्ज रहावं. असं आवाहन भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
संजय राऊत यांचं प्रत्युत्तर
यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आम्ही तयार असल्याचं म्हटलं आहे. शरद पवार यांनी आपण तयार असल्याचं म्हटलं आहे. तुम्ही काय करणार आमच्यावर धाडी टाकणार, खोटे गुन्हे दाखल करणार अजून काय करु शकता, जे हवं ते करा आम्हीही तयार आहोत, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिली आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकीचा आणि मुंबई पालिकेचा काही संबंध नाही. गेली 50 वर्ष आम्ही पालिका लढत असून पालिकेवर भगवाच झेंडा कायम राहील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
पंजाबमध्ये तुमचा मोठा पराभव
लोकशाहीत विजय-पराभव होत असतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पण तुमच्या पक्षाच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे, उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरले, गोव्यात दोन उपमुख्यमंत्र हरले, पंजाबमध्ये भाजपाला पूर्णपणे नाकरालं आहे. उत्तर प्रदेशमध्ये कमी जागा मिळाल्यावरुन तुम्ही आम्हाल बोलत आहात, पण काँग्रेस आणि शिवसेनेचा जो पराभव झाला आहे, त्यापेक्षा मोठा पराभव तुमचा पंजाबमध्ये झाला आहे असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
तपास यंत्रणांवर दबाव
चुकीच्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत. एकाच पक्षाचे एकाच आघाडीचे लोकं टार्गेट केले जात आहेत पश्चिम महाराष्ट्र आणि बंगाल यावर आपण मत व्यक्त केलं पाहिजे. केंद्रीय तपास यंत्रणा राजकीय दबावखाली काम करत आहेत यावर आघाडी ठाम आहे. मी जरी तिथे बोललो आणि दहा मिनिटांनी घरावर माझ्या रेड पडली तरी मी घाबरत नाही. सत्य सांगणे हा दबाव आहे, तर मग सत्य ऐकण्याची देखील तयारी ठेवा असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.