Sushma Andhare on Devendra Fadnavis Letter : नागपूरात सुरु असणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी बाकावर एक असं चित्र पाहायला मिळालं, ज्यामुळं अनेकांच्याच भुवया उंचावल्या. निमित्त ठरलं ते म्हणजे देशद्रोहाच्या आरोपानंतर पाच अधिवेशनांनंतर परतलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत असल्याची भूमिका स्पष्ट करत मलिक सत्ताधारी बाकावर आले आणि भाजपला मात्र युतीमध्ये झालेली ही कृती रुचली नाही. ज्यामुळं नव्यानं राजकीय खेळीला सुरुवात झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलिकांना महायुतीमध्ये घेण्यास नकार देणारी पक्षाची भूमिका मांडत भाजपच्या वतीनं देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना उद्देशून एक जाहीर पत्र लिहिलं. 'सत्ता येते आणि जाते. पण, सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा...' अशा मथळ्याखाली त्यांनी हे पत्र X च्या माध्यमातून सर्वांसमोर आणलं. 


इथं फडणवीसांनी आपली भूमिका मांडत मलिकांच्या सहभागावर आक्षेप घेतला. यामध्ये 'वैयक्तिक शत्रूता किंवा आकस अजिबातच नाही' ही ओळ त्यांनी पत्राच्या सुरुवातीलाच स्पष्ट केली. राजकीय वर्तुळामध्ये फडणवीसांच्या या पत्राची चर्चा सुरु असतानाच आता त्यावर इतर मंडळी व्यक्त होऊ लागली आहेत. शिवसेनेतील ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून फडणवीसांच्या पत्राचा संदर्भ देत खोचक सवाल केला. 


हेसुद्धा वाचा : पत्रास कारण नवाब मलिक... फडणवीसांनी अजित पवारांना लिहिलेलं पत्र जसंच्या तसं


 


अंधारे म्हणल्या...


"बूँद से गयी सो हौद से नहीं आती है देवबाबु.." 
ज्यांना पत्र लिहिताय त्याच अजितदादांवर 70,000 कोटीच्या घोटाळ्याचे आरोप तुमच्या वरिष्ठ नेत्यांनी केले. मग मोदीजिंना ही 'सत्ता येते-जाते पण देश महत्त्वाचा' हे समजावून सांगणारे पत्र तुम्ही लिहिणार का ?, असा एकंदर सूर त्यांनी पत्राच्या माध्यमातून आळवला. 




सत्तेपेक्षा देश मोठा असं फडणवीसांना वाटत असेल, तर आतापर्यंत भाजपनं ज्या मंडळींवर आरोप केले आहेत त्यांना सत्तेत सामावून घेताना हा विवेकवाद कुठे गेला होता? असा प्रश्न अंधारे यांनी केला. ज्या अजित पवार यांना पत्र लिहिलं, त्यांच्यावरच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रात येऊन बँक घोटाळ्यासारखे गंभीर आरोप केले होते. पण, इतके आरोप असूनही त्यांना सत्तेत सामावून घेणं तुमच्या नैतिकतेमध्ये होतं का? असा थेट प्रश्न अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करत भाजपच्या भूमिकेवरच नाराजी व्यक्त केली.