Shivsena Mla Disqualification : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांना अपात्र ठरवल्याप्रकरणी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी यांनी हा निकाल दिला आहे. सभापतींचा निर्णय उद्धव ठाकरे गटाच्या विरोधात गेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालालील पक्षच खरी शिवसेना असल्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. तसेच दोन्ही गटांच्या आमदाराविरुद्धच्या अपात्रता याचिका अध्यक्षांना फेटाळून लावल्या. त्यामुळे शिवसेनेच सगळेच आमदार पात्र ठरले आहेत. मात्र आता हा निकाल देणाऱ्या राहुल नार्वेकरांवर ठाकरे गटासह विरोधकांकडून आक्षेप घेण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातील निकाल वाचून दाखवला. जवळपास 105 मिनिटे राहुल नार्वेकर हे इंग्रजीमध्ये निकाल वाचन करत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेची घटना, नेतृत्वरचना आणि विधिमंडळ संख्याबळ या तीन मुद्द्यांवर भाष्य केले. निकाल देताना पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचे म्हटले. त्यासाठी त्यांनी शिवसेनेची 2018 मधील घटना अमान्य केली. मात्र यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा निकाल इंग्रजीत का वाचून दाखवला असा सवाल केला आहे.


काय म्हणाल्या अंजली दमानिया?


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्राचा महानिकाल वाचून दाखवला. निकाल वाचत असताना संपूर्ण निकाल मी स्वतः लाईव्ह पाहिला. त्यावेळी मला काही प्रश्न पडले. महाराष्ट्राच्या महानिकालाच इंग्रजीत वाचन का? मला वाटले की सुरवातीचे पाच मिनिटे इंग्रजीत असावीत. पण पूर्णच निकाल इंग्रजीत दिला. अध्यक्ष निकाल वाचताना अडखळत देखील होते. तेव्हा मला वाटतंय की निकाल स्वतः अध्यक्ष यांनी लिहिला होता की त्यांना कोणी ड्राफ्ट बनवून दिला होता. अध्यक्ष ज्या ठिकाणी अडखळत होते त्याबद्दल त्यांना जर आज जरी विचारलं तरी त्यांना नीट उत्तर देता येणार नाहीत. निकालातील प्रश्नावर ते उत्तर देऊ शकणार नाही. निकालात त्यांचे शब्द नव्हते, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.


यासोबत अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावरही याबाबत भाष्य केलं आहे. "महाराष्ट्राचा महानिकाल चक्क इंग्रजीत? कोणी ड्राफ्ट केलं? सुप्रीम कोर्टाच्या तुषार मेहतांनी? नक्कीच कोणीतरी सुप्रीम कोर्टाचे वकील असतील. यांनी फक्त वाचण्याचे काम केले. इंग्रजीत का वाचलं? कारण त्याचे मराठीत भाषांतर येत नसावे. विधानसभा अध्यक्षांना त्यातले धड शब्द पण वाचता येत नव्हते," असे अंजली दमानिया या त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.



दरम्यान, अंजली दमानिया यांच्या या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहे. विधानसभा अध्यक्षांबाबत प्रश्न विचारताच काही नेटकऱ्यांनी दमानिया यांना ट्रोल केलं तर काहीनीं त्यांचे समर्थन केलं आहे.