नवी दिल्ली : लोकसभा निवणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर भाजपा प्रणित पक्षांचं नवं मंत्रिमंडळ गुरुवारी जाहीर केलं जात आहे. गुरुवारीच या नवनिर्वाचित मंत्र्यांचा शपथिविधी सोहळाही पार पडणार आहे. साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या दिमाखदार सोहळ्यात नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधानपदासाठीची शपथ घेणार आहेत. २०१४ मध्ये मोदींनी पहिल्यांदाच या देशाच्या पंतप्रधानपदाची सुत्र हाती घेतली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाच वर्षांच्या या कारकिर्दीत त्यांचा आलेख उंचावत गेला. याच बळावर प्रधानसेवक, चौकिदार इथपासून आता थेट देशाचे पालक होण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे, असं शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं गेलं आहे. 


मोदींच्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने 'सामना'च्या या अग्रलेखात ही सारी ईश्वरी योजनाच असल्याचं म्हणण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदींवर विरोधकांनी उठवलेली टीकेची झोड, पश्चिम बंगालमध्ये झालेला हिंसाचार यांचा ठळक उल्लेखही अग्रलेखातून करण्यात आला. ममता बॅनर्जी यांचं आणि मोदींचं राजकीय समीकरण नेमकं कसं आहे, हे सांगत बदलेल्या परिस्थितीचा थो़क्यात आढावा अग्रलेखात देण्यात आला. 


जगनमोहन रेड्डींचं मोदींच्या भेटीला जाणं आणि आंध्र प्रदेशचे प्रश्न देशाच्या पंतप्रधानांपुढे ठेवणं, त्यांनी त्या समस्यांवर काम करण्यातं आश्वासन देत रेड्डींच्या मागण्या मान्य करणं या सर्व गोष्टींवर प्रकाशझोत टाकत सध्याच्या राजकीय वातावरणाला सकारात्मक दृष्टीने अग्रलेखाच्या माध्यमातून सर्वांसमोर ठेवण्यात आलं आहे. 


पाकिस्तानशी देशाचं असणारं एकंदर समीकरण पाहता २०१४ मध्ये मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी नवाज शरीफ यांची उपस्थिती होती. पण, यंदा मात्र हा विषप्रयोग नको असं म्हणत देशभावनेच्या विरोधाच जाण्याचा मोदीचा मनसुबा नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं. शिवसेनेतच्या या मुखपत्रातील अग्रलेख हा नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची ग्वाही देत आहे, असं म्हणायला हरकत नाही. अग्रलेखातील उल्लेख आणि मोदींचं वर्णन करताना वापरण्यात आलेली विशेषणं ही विशेष लक्षवेधी ठरत आहेत.