`राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह` Sanjay Raut यांचा घणाघात
Sanjay Raut: राज्यपाल आणि भाजपचे नेते सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतायत, आता 40 आमदारांचा स्वाभिमान आडवा येत नाही का? संजय राऊत यांचा सवाल
Sanjay Raut Exclusive : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis Government) आल्यापासून हिंदुत्वावर (Hindutwa) सर्वात मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार केला जातो, त्यांचा इतका घोर अपमान गेल्या पंधरा दिवसात या महाराष्ट्रात सुरु आहे असा घणाघात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. झी 24 तासच्या 'ब्लँक अँड व्हाईट' या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निशाणा साधला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान
ज्यांनी तुम्हाला शपथ दिली ते राज्यपाल (Bhagat Singh Koshyari) शिवरायांचा अपमान करतायत, ज्यांच्या पाठिंब्यावर तुम्ही सरकार बनवलंय त्या भाजपचे एक राष्ट्रीय प्रवक्ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी कशी माफी मागितली, औरंगजेबाकडे कशी पत्र पाठवली, याचे खुलासे करतायत, हा हिंदुत्वाचा प्रश्न येत नाही? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
भाजप नेते मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्राहून सुटकेशी केली. हा अपमान किंवा त्यांचा स्वाभिमान आडवा येत नाही का? यावर किती लोकांनी राजीनामे दिले, किती लोकांनी बंड केलं आता आम्ही सरकारमधून बाहेर पडतो असं त्यांनी म्हटलं का? असा सवालही उपस्थित केला.
सीमाप्रश्नावर 40 स्वाभिमानी गप्प का?
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी कधी नव्हे ती अभूतपूर्व परिस्थिती आमच्यासमोर उभी केली आहे, त्यांनी सांगली आणि सोलापूरवर हक्क सांगितला, असं कधी झालं नव्हतं. बेळगाव आणि कारवारमधील काही गावांचा लढा होता, आम्ही न्यायालयीन लढाई लढत होतो, पण बाजूच्या राज्याचा मुख्यमंत्री सरळ म्हणतो की हे दोन जिल्हे आमचे आहेत, आणि आमचे मुख्यमंत्री आणि त्यांचे 40 स्वाभिमानी लोकं गप्प आहेत. त्यामुळे तुम्ही स्वाभिमान आणि हिंदुत्वाच्या गप्पा मारू नका, तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी बेईमानी केली, हे आता स्पष्ट होतंय असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
चुकीच्या बदल्यांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चुकीची कामं करत नव्हती, जी आता केली जात आहेत, मंत्रालयात घुसून बदल्या, बडत्या, चुकीच्या माणसांच्या बदल्या, आणि त्याचून आर्थिक व्यवहार अशा प्रकारच्या कामांना तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना नकार दिला. आपण जनतेशी वचनबद्ध आहोत या मताचे आम्ही आहोत, आता कोणीही उठतोय, प्रशासनाला शिव्या घालतोय, दादागिरी करतो, बंदूका काढीन म्हणतो, हे ठाकरेंच्या काळात होत नव्हतं, आता चालवून घेतलं जातंय कारण चाळीस आमदार फोडून त्यांचे लाड करुन हे सरकार आलंय अशी टीका संजय राऊत यांनी केली.
उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरत नाहीत?
उद्धव ठाकरे कधी रस्त्यावर उतरले नाहीत, जनतेच्या भेटी गाठी घेत नव्हते असे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत, यावर बोलताना संजय राऊत यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं आहे. तुम्हाला राज्याचा कारभार चालवण्यासाठी लोकांनी लढवून दिलं आहे, पक्षाचे इतर नेते आहेत, कोरोना काळात जो बंद पुकारला होता, तो तुमच्याच पंतप्रधानांनी पुकारला होता. तुमचे पंतप्रधान घरात मास्क लावून बसले होते, केंद्राचे मंत्री घरी बसले होते, राज्यपाल घरी बसले होते, आणि मुख्यमंत्र्यांनी जावं, ही तुमची भूमिका असेल तर तूम्ही मुर्ख आहात, असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.
तुम्ही खोटारडे आणि ढोंगी आहात. दीड ते दोन वर्ष महाराष्ट्र काय अख्खा देश आणि जग लॉकडाऊनमध्ये होतं. आताची चीनमध्ये लॉकडाऊन आहे. आपल्या देशात आपल्या राज्यात पुन्हा कोरोना येऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुरेपर काळजी घेत होते, नियम पाळायला स्वत:पासून सुरुवात करायची असते. कागदावर सह्या मारल्या म्हणजे कामं होत नाहीत. ज्या कागदावर तुम्ही सह्या करता त्यातल्या किती लोकांची कामं होतायत, तुमचे 40 आमदार सोडले, तर बाकीच्यांची काम होत नाहीत. कोणाच्याही बदल्या कशाही करायची, दलाल नेमायचे त्यातून पैसे काढायचे, या कामासाठी सरकार नसतं. सरकारने प्रशासनाला बरोबर घेऊन चालायचं असतं असं संजय राऊत यांनी म्हटलंय.