मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या मुंबईतील भायखळा इथल्या आर्थर रोड (arthur road jail) तुरुंगात आहेत. ईडीने (ED) त्यांना पत्राचाळ आर्थिक (Patrachawl Scam) गैरव्यवहार प्रकरणी अटक केली आहे. सध्या ते आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनीदेखील संजय राऊत यांच्यवर मानहानीचा खटला भरला आहे. त्या प्रकरणी आज सुनावणी पार पडली.


व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संजय राऊत कोर्टसमोर हजर
याच प्रकरणात आज शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने संजय राऊत यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे (video conferencing) हजर राहण्याचे आदेश दिले. यानंतर अर्ध्या तासातच संजय राऊत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयासमोर हजर झाले. न्यायाधीश मोकाशी यांनी संजय राऊत यांना तुम्ही मेधा सोमय्या यांची बदनामी केली असा आरोप आहे हा गुन्हा तुम्हाला मान्य आहे का अशी विचारणा केली. 


यावर संजय राऊत यांनी स्पष्टपणे आपल्याला हा गुन्हा मान्य नाही असे न्यायालयाला सांगितले.  न्यायालयाने आपल्या वकिलांची यावर सही घेतो असं संजय राऊत यांना सांगितलं. यावर आपले आपल्या वकिलांशी बोलणेच झाले नाही असं राऊत यांनी न्यायाधीशांना सांगितलं. यावर तात्काळ न्यायाधीशांनी लॅपटॉप राऊत यांच्या वकिलांकडे दिला. 


संजय राऊत यांनी वकिलांशी या प्रकरणी चर्चा केली आणि गुन्हा मान्य नसल्याचं सांगितलं. आता या प्रकरणी 19 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. तर संजय राऊत यांच्याकडून डिस्चार्ज फाईल केले जाणार असल्याची माहिती त्यांचे वकील ऍड. सनी जैन यांनी दिली. 


काय आहे प्रकरण?
संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर मीरा भाईंदर इथे शौचालय बांधण्यात 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. यावर मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे.