मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी भल्या पहाटे राजभवनात जाऊन घेतलेल्या शपथविधीला आज वर्ष पूर्ण झालंय. संख्याबळाच्या अभावी दोघांनाही राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर पुढच्या तीन दिवसात राज्यात महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी झाला. पण ही ऐतिहासिक पहाट राज्याच्या राजकारणात कायमची नोंदवली गेली. यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ती पहाट नव्हती, तो अंधकारच होता. त्या अंधकारामध्ये सत्तेची प्रकाशकिरणे परत कधीच दिसणार नाहीत असे संजय राऊत म्हणाले. चार वर्षानं पुन्हा आम्हीच जिंकणार आहोत. पहाटे पहाटे मला जाग आली, ते अजून झोपलेले नाहीत. आम्हाला धक्का काही बसला नव्हता. त्या स्मृती आनंददायक आहेत असे राऊत म्हणाले. त्या पहाटेनंतर त्यांना धक्के बसलेत, ते अजून सावरलेले नाहीत. वो सूबह फिर ना आयेगी असा मिश्किल टोला त्यांनी भाजपला 'त्या' शपथविधीच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने लगावला. 


राज्यपाल आणि सरकारमध्ये‌ संघर्ष नाही. ते घटनाबाह्य काम करून देशात बदनाम होतील असं मला वाटत नाही. ते अत्यंत संत सज्जनासारखे राज्यपाल आहेत. इतका संत आणि सज्जन राज्यपाल मी महाराष्ट्रात पाहिलेला नाही. अत्यंत सरसोट राजकारण करणारे ते नेते आहेत अशा शेलक्या शब्दात त्यांनी राज्यपालांवर टीका केली. 



शरद पवारांवर टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा देखील राऊतांनी समाचार घेतला. शरद पवारांना जे छोटे नेते म्हणतायत, त्यांना पवार साहेबांची राजकारणातील उतुगंता पाहणं झेपलेली नाही. इतक्या छोट्या नेत्याला मोदी सरकारने पवार यांना भारतरत्ननंतरचा पद्मविभूषण पुरस्कार देवून कार्याचा गौरव केल्याची आठवण राऊतांनी यावेळी करुन दिली.  


हे चंद्रकांतदादांना माहिती नसेल तर त्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडून माहिती घ्यावी. याच छोट्या नेत्यांकडून मोदी‌साहेब गुजरातचा आणि देशाचा कारभार करत होते. करत असावेत असं मला वाटतंय असं राऊत म्हणाले. चंद्रकांत पाटील आणि भाजपमध्ये वैचारिक दरी निर्माण झालेली दिसतंय अशी शंका देखील राऊतांनी उपस्थित केली.