मुंबईत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची एकत्र बैठक
राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग...
मुंबई : राज्यातल्या सत्तास्थापनेच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. सरकार स्थापनेवर चर्चा करण्यासाठी आज काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकासआघाडीची महत्त्वाची बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीला काँग्रेसकडून के.सी. वेणूगोपाल, मल्लिकार्जुन खरगे आणि अहमद पटेल उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी २ वाजता महाविकास आघाडीची अंतिम बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. नवे सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया आजच सुरू करण्यात येण्याची चिन्ह आहेत.
राज्याच्या सत्तास्थापनेचा पेच सोडवण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकासआघाडीसाठी रात्रीही खलबतं सुरु होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मध्यरात्री सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी जाऊन शरद पवारांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्या सोबत आमदार आदित्य ठाकरे तसंच खासदार संजय राऊतही उपस्थित होते.
सत्तास्थापनेसोबत काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील सहमतीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पवार-ठाकरेंच्या भेटीत सत्तावाटपावर चर्चा झाल्याचं समजतं आहे. सुमारे सव्वा तास दोघांमध्ये चर्चा सुरु होती. त्यानंतर उद्धव ठाकरे मातोश्रीवर परतले. मात्र भेटीनंतर कोणीही प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली नाही. ही भेट सकारात्मक झाल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत.
महाविकासआघाडीकडून आजच सत्तास्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता आहे. २६ नोव्हेंबरला संविधान दिनाचा मुहूर्त साधत शपथविधी व्हावा, अशी काँग्रेसची मागणी असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे आजच महाविकासआघाडीचे नेते राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.