मुंबई: शिवसेनेच्या गणेशोत्सवाबाबतच्या दुटप्पी भूमिकेमुळे कोकणी जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. भविष्यात त्याची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांवर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. याशिवाय, कोकणात जाण्यासाठी नेहमीप्रमाणे एसटी बसेसची सुविधा  करण्यात आलेली नाही. यावरुन सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये राजकारण रंगले आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकार कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना कोणतीही बंदी नाही असे सांगत असले तरी स्थानिक नेत्यांची भूमिका काहीशी वेगळी आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी गरज असेल तरच गणपतीसाठी कोकणात या, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपकडून शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे. 

विनायक राऊत यांचे वक्तव्य अत्यंत दुटप्पीपणाचे आहे. ज्या कोकणी जनतेच्या भावनेवर स्वार होऊन शिवसेनेनं राजकीय यश मिळवलं. ज्या चाकरमान्यांनी शिवसेना वाढवली, त्याच चाकरमान्यांच्या भावनेला आता शिवसेना पायदळी तुडवत आहे. याची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या तीन किलोमीटर रांगा
गणेशोत्सावासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रविवारी पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण टोलनाका आणि कशेडी घाटात वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याने या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दोन ते तीन किलोमीटर पर्यंत या रांगा लागल्याने चाकरमान्यांना रस्त्यातच अडकून पडावे लागले आहे. गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात आतपर्यंत दीड लाख चाकरमानी दाखल झाले आहेत. अजून एक ते दीड लाख चाकरमानी कोकणात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.