युतीचा इफेक्ट, शिवसेनेच्या मुखपत्रात भाजपचे रेकॉर्डब्रेक कौतुक
महाराष्ट्र पुन्हा नंबर १ होणार
मुंबई: आतापर्यंत तुरळक अपवाद वगळता नित्यनियमाने केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या धोरणांचे वाभाडे काढणाऱ्या शिवसेनेच्या भाषेत भाजपशी युती झाल्यानंतर कमालीचा बदल झाला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तील अग्रलेखातून याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. आजच्या या अग्रलेखात शिवसेनेकडून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुक्तकंठाने तारीफ करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली होती. त्यानंतर 'सामना'तील अग्रलेखांच्या माध्यमातून आग ओकणाऱ्या शिवसेनेच्या तोफा थंडावल्या आहेत.
मात्र, आजच्या अग्रलेखात यापुढे जात शिवसेनेने राज्य सरकारच्या धोरणांचे कौतुक केले आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर सरकारने नुकतेच नवे उद्योग धोरण जाहीर केले होते. या धोरणाची अग्रलेखातून मुक्तकंठाने तारीफ करण्यात आली आहे. यामध्ये म्हटले आहे की, राज्य मंत्रिमंडळाचे ‘रेकॉर्डब्रेक’ निर्णय आणि आणि महाराष्ट्राला पुन्हा ‘नंबर वन’ बनविणारे नवीन उद्योग धोरण याचा फायदा राज्याला आणि जनतेलाच होणार आहे. विरोधकांना मात्र यामुळे ‘ब्रेक’ लागणार आहे. कदाचित म्हणूनच यातही त्यांना राजकीय ‘कुसळ’ दिसू शकते. खरे म्हणजे त्यांच्या राजवटीतील खड्डा भरून काढत महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर आला याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त करायला हवा. सरकारचे ‘ब्रेकिंग’ निर्णय आणि उद्योगाचे ‘अव्वल’ धोरण यामुळे यापुढेही महाराष्ट्र नंबर वनच राहील याविषयी आमच्या मनात शंका नाही, असा दावा शिवसेनेने केला आहे.
'सामना'तील अग्रलेख लता मंगेशकरांच्या आवाजापेक्षाही गोड वाटतोय- धनंजय मुंडे
राज्य सरकारने नुकतीच कोकणातील नाणार प्रकल्प रद्द करण्यात आल्याची घोषणा केली होती. शिवसेनेने नाणार प्रकल्प रद्द करण्यासाठी संपूर्ण जोर पणाला लावला होता. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला खुश केल्याची चर्चा आहे. यानंतर शिवसेनेनेही एक पाऊल पुढे टाकत राज्य सरकारचे कौतुक केले. मात्र, आता विरोधक शिवसेनेच्या या बदललेल्या भूमिकेवर काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.