कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : विधानसभा निवडणुकीकरता शिवसेनेची भाषा समन्वयाची असली तरी तयारी मात्र स्वबळाची सुरू असल्याचे दिसते. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना 'माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र' हे अभियान राबवत आहे. तसंच आज उद्धव ठाकरेंनी २८८ विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक घेवून तयारीचा आढावा घेतला आहे. शिवसेनेच्या ५३व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीला एकत्रच सामोरं जाणार असल्याचे अगदी ठासून सांगितले. पण सध्या कितीही दिलजमाईची भाषा केली जात असली तरी मागील विधानसभा निवडणुकीचा अनुभव पाहता युतीबाबत शेवटच्या क्षणी काय होईल हे सांगता येत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेने स्वबळाची पूर्ण तयारी सुरू केली असून संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी शिवसेना राज्यभरात १४ जुलै ते २७ जुलै दरम्यान 'माझा महाराष्ट्र,भगवा महाराष्ट्र' हे अभियान राबवत आहे.


ज्या माध्यमातून सध्या असलेल्या २० हजार शाखांची संख्या १ लाखांवर नेण्यात येणार आहे. प्रत्येक गावात ग्रामपंचायतीचे जितके प्रभाग असतील तेवढ्याच संख्येने शाखा निर्माण केल्या जातील. यानंतर प्रत्येक ठिकाणी शाखाप्रमुख आणि महिला संघटक यांची नेमणूक केली जाईल. 


प्रत्येक शाखाप्रमुखांना ओळखपत्रही दिले जाणार आहे. सर्व बूथप्रमुख नेमले जातील. शिवसैनिकांची नोंदणीही यावेळी होईल. २७ जुलैला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस राज्यभरात विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवून साजरा करण्याचे आवाहन करण्यात आलंय. या अभियानातून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सारा महाराष्ट्र भगवामय करण्याचे उद्दिष्टय ठेवलं गेल्याचे शिवसेना उपनेते विश्वास नेरूरकर यांनी सांगितले.


दगाफटका झाल्यास स्वबळाची तयारी असावी, या दृष्टीकोनातूनच उद्धव ठाकरे यांनी सेना भवनात शुक्रवारी सर्व २८८ विधानसभा संपर्कप्रमुख बैठक घेतली. ज्यामध्ये वरील कार्यक्रम राबवण्याच्या सूचना देऊन विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आले.