वांद्रे पूर्वच्या बंडखोर उमेदवार तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी
शिवसेनेची बंडखोरांवर कारवाई
मुंबई : वांद्रे पूर्व मतदारसंघातून बंडखोरी करणाऱ्या तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. वांद्रे पूर्वमध्ये मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेना उमेदवाराच्या विरोधात तृप्ती सांवत यांनी अर्ज भरल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
2009 साली शिवसेनेने हा मतदारसंघ जिंकला होता. बाळा सावंत यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत या विजयी झाल्या होत्या. पण आता उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला होता. त्यामुळे शिवसेनेसाठी नवीन आव्हान तयार झालं आहे.
2015 च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने नारायण राणे यांना येथून मैदानात उतरवलं होतं. पण राणेंना येथे पराभवाचा सामना करावा लागला होता. शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांना 52711 मते तर नारायण राणे यांना 33703 मते मिळाली होती. तर एमआयएमच्या रहेबर सिराज खान यांना 15050 मते मिळाली होती.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर, अपक्ष उमेदवार तृप्ती सावंत, काँग्रेसचे झिशान सिद्दीकी मैदानात आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघातून कोण बाजी मारणार हे 24 ऑक्टोबरलाच कळणार आहे.
कल्याण पूर्वमधून भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्याविरोधात शिवसेनेचे माजी नगरसेवक धनंजय बोडारे, वर्सोवामध्ये शिवसंग्रामच्या भारती लव्हेकर यांच्याविरोधात शिवसेना नगरसेविका राजुल पटेल, घाटकोपर पश्चिम, कणकवली या ठिकाणीही शिवसेनेतून बंडखोरी झाली आहे. त्यामुळे आता शिवसेना इतर बंडखोरांवर कारवाई करणार हे पाहावं लागेल.