मुंबई : पालघर येथील साधूंच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ज्याप्रकारे विधाने केली होती. ती बघता आता ते गप्प का बसले आहेत. काही बोलत नाही. हाथरस अत्याचारानंतर हिंदुत्वाचा शंखनाद करणारे आज का थंड पडले आहेत. आता कुठे भाजपचे हिंदुत्व गेले, असा रोखठोक सवाल शिवसेनेने भाजपला विचारला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या उत्तर प्रदेशात चालले आहे ते ठिक नाही.  उत्तर प्रदेशात ‘रामराज्य’ वगैरे नसून कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत ‘जंगलराज’ आहे. महिलांवर अत्याचार सुरूच आहेत, पण तरुणींवर बलात्कार आणि खून करण्याच्या घटना योगी यांच्या राज्यात वाढल्या आहेत. १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार आणि नंतर खून झाला. त्यानंतर देशात संताप आणि चीड व्यक्त होत आहे. मरणाच्या दारात असताना तिने बलात्कार झाल्याचे सांगितले. आता उत्तर प्रदेशचे सरकार म्हणते बलात्कार वगैरे सगळे झूठ आहे. पाठोपाठ बलरामपूरमध्येही सामूहिक बलात्काराचे प्रकरण झाले, पण ना दिल्लीतील अश्रूंचा बांध फुटला ना योगी सरकारच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. बलात्कार झालाच नाही तर विरोधकांनी बोंबलायचे कशाला? असे सरकारच बोंबलत आहे, असा हल्लाबोल शिवसेनेने केला आहे.


अग्रलेखात काय म्हटलेय?



महाराष्ट्रातील पालघरात दोन साधू पुरुषांची जमावाने हत्या केली तेव्हा वेदनेने तळमळणाऱ्या योगींची विधाने आम्ही पाहिली आहेत. संपूर्ण भाजप तेव्हा हिंदुत्वाच्या नावाने शंख फुंकत होता. मग हाथरस, बलरामपूर प्रकरणात हा हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला आहे? मुंबईत एका नटीचे बेकायदा बांधकाम कायद्याने तोडले म्हणून ‘कर्कश’ मीडियाचे अँकर्सही आज तोंडात बोळे कोंबून बसले आहेत. देश इतका निर्जीव, हतबल कधीच झाला नव्हता. चारशे-पाचशे वर्षांपूर्वीची बाबरी पाडली म्हणून पेटलेला हा देश एका मुलीच्या देहाची विटंबना होऊनही थंड पडला असेल तर या देशाने सत्त्व गमावले आहे, समाज नपुंसक बनला आहे व मतदार गुलाम झाला आहे. हाथरसच्या मातीत राख होऊन हुंदके देणाऱ्या ए अबले, आम्हाला माफ कर!, असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.


उत्तर प्रदेशात ‘रामराज्य’ वगैरे नसून कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत ‘जंगलराज’ आहे. महिलांवर अत्याचार सुरूच आहेत, पण तरुणींवर बलात्कार आणि खून करण्याच्या घटना योगींच्या राज्यात वाढल्या आहेत. हाथरसमध्ये बलात्कार झालाच नाही, तर रात्रीच्या अंधारात त्या तरुणीचा मृतदेह पोलिसांनी पेट्रोल ओतून का जाळला? पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटायला निघालेल्या राहुल गांधी यांना अडवलेच, पण त्यांना कॉलर पकडून धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडले. देशातील एका प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यास असे वागवणे, अपमानित करणे हे लोकशाहीवर ‘गँगरेप’ होत असल्याचेच लक्षण आहे, असे अग्रेलखात नमुद करण्यात आले आहे. 


अत्याचारांबाबत आवाज उठवाल तर याद राखा !



राहुल गांधी हे राष्ट्रीय काँगेसचे माजी अध्यक्ष आहेत. राहुल गांधी हे महान इंदिरा गांधींचे नातू व तडफदार राजीव गांधींचे सुपुत्र आहेत. इंदिरा व राजीव गांधी यांनी देशाच्या सार्वभौमत्वासाठी हौतात्म्य पत्करले, पण देशासाठी रक्त तर सोडाच, घामाचा, त्यागाचा एक थेंबही ज्यांनी सांडला नाही अशा सत्ताधीशांच्या आदेशाने राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्यात आला. ‘‘महिलांवरील बलात्कार, अत्याचारांबाबत आवाज उठवाल तर याद राखा’’ असेच जणू योगी सरकारने बजावले आहे. हाथरसच्या एका गावात पीडित महिलेच्या माता-पित्यांना पोलिसांनी कोंडून ठेवले आहे. संपूर्ण गाव बंदूकधारी पोलिसांनी घेरून ठेवले आहे. जिल्हाधिकारी पीडितेच्या कुटुंबीयांना सरळ सरळ धमकावत असल्याची टेप समोर आली आहे. ‘‘आज हे मीडियावाले गावात आहेत. ते दोन दिवसांत जाणारच आहेत. मग तुम्ही काय करणार? तुम्हाला आमच्याशीच बोलावे लागेल. तेव्हा आता तोंड बंद ठेवा!’’ असे धमकावणाऱ्या अधिकाऱ्यांनी माणुसकीला काळिमा फासला आहे, असे 'सामना'तून शिवसेनेने म्हटले आहे.


अबलांना, मातांना सुरक्षा का नाही ?


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे संन्यासी आहेत. ते भगव्या कपड्यांत वावरतात. पंतप्रधान मोदी हे तर फकीर आहेत, पण मोदी यांना जगातील सर्वोच्च दर्जाची सुरक्षा आहे. योगी यांनाही मोठी सुरक्षा आहे. अखिलेश सरकारने एकदा योगी यांची सुरक्षा मागे घेतली, तेव्हा संसदेच्या सभागृहात याच योगी महाराजांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. आज तेच योगी मुख्यमंत्री आहेत, पण अबलांना, मातांना सुरक्षा नाही. बलात्काराने विटंबना झालेले अबलांचे मृतदेह पोलीस पेट्रोल ओतून जाळत आहेत. हे नराधम कृत्य हिंदुत्वाच्या कोणत्या परंपरेत बसते? मृतदेहाची विटंबना करू नका, मृतदेहांनाही सन्मानाने अंत्यसंस्कार होण्याचा अधिकार आहे, पण मृतदेह पेट्रोल ओतून कोणत्याही रूढी-परंपरेशिवाय जाळले जात असतील तर ती महिला देहाची, हिंदू संस्कृतीची विटंबनाच आहे. अयोध्येतील सीतामाईही आज भयाने, वेदनेने धरणीत गडप झाली असेल. महाराष्ट्रातील पालघरात दोन साधू पुरुषांची जमावाने हत्या केली तेव्हा वेदनेने तळमळणाऱ्या योगींची विधाने आम्ही पाहिली आहेत. संपूर्ण भाजप तेव्हा हिंदुत्वाच्या नावाने शंख फुंकत होता. मग हाथरस, बलरामपूर प्रकरणात हा हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला आहे, असा थेट सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.