मुंबई : युतीत ताणले गेलेले संबंध, एकमेकांविरोधात मध्यावधी निवडणुकांच्या भीतिचं राजकारण अशा वातावरणात शिवसेना आज आपला 51 वा वर्धापन दिन साजरा करतेय. मुंबईत षण्मुखानंद सभागृहात होणाऱ्या सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाच्या पुढच्या राजकीय वाटचालीच्या दृष्टीनं शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांच्या भाषणाबाबत उत्सुकता निर्माण झालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडच्या काळात मुंबई महापालिका निवडणुकीपासून भाजपशी निर्माण झालेला दुराव्यापासून ते GST, शेतकऱयांची कर्जमाफी, समृद्धी महामार्ग अशा एक ना अनेक विषयांवर युतीत कमालीचे मतभेद निर्माण झालेत. त्यातच काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काल 'मातोश्री' वारी करून शिवसनेनेन अन्य घटक पक्षांप्रमाणे या निवडणुकीत NDA सोबत राहण्याचा प्रस्ताव ठेवलाय. मात्र आधी राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर मग पाठिंब्याचं पाहू अशी ताठर भूमिका शिवसेनेनं घेतलीय. सरसंघचालक मोहनराव भागवत आणि कृषीतज्ञ स्वामिनाथन हे दोन पर्याय शिवसेनेनं भाजपला सुचवले आहेत. त्यामुळे एकूणच आजचे उद्धव  ठाकरे यांचे भाषण संपूर्णपणे राजकीय मुद्द्यांवर केंद्रित असणार असा अंदाज व्यक्त केला जातोय.