शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने धारावी पुनर्विकास प्रकल्पा विरोधात आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. धारावी टी जंक्शन येथून दुपारी 3 वाजता हा मोर्चा निघणार असून बीकेसीच्या फटका मैदानात सभेत रूपांतर होणार आहे. धारावी टी जंक्शन येथे या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले आहेत. तसंच सकाळपासून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. पण नंतर पोलिसांनी परवानगी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धारावी पुनर्विकास प्रकल्पातून अदानी कंपनीला देण्यात आलेल्या विविध सवली रद्द कराव्यात आणि सर्व रहिवाशांना त्याच परिसरात जागा मिळावी या मागणीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार असून, या मोर्चात धारावी बचावसाठी उतरलेल्या संघटना आणि महाविकास आघाडीतील पक्ष सहभागी होणार आहेत. 


अदानी रिएल्टीला मंजूर केलेली धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा रद्द करावी आणि म्हाडाच्या माध्यमातून शासनाने पुनर्विकास प्रकल्प राबवावा अशी मोर्चाची प्रमुख मागणी आहे. 


देवेंद्र फडणवीसांची टीका


"उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला धारावीच्या गरिबांना घरं मिळू द्यायची नाहीत. हा प्रकल्प त्यांना होऊ द्यायचा नाही. नवीन कंत्राटदारांच्या सगळ्या अती शर्ती उद्धव ठाकरे यांनीच ठरवलेल्या आहेत. उद्धव ठाकरे दुटप्पी भूमिका घेतात. केवळ टीडीआर लॉबीच्या फायद्यासाठी सुपारी घेऊन मोर्चा काढण्यात येत आहे. या  मोर्चाचा काही परिणाम होणार नाही. आम्ही धारावीकरांना पक्की घर देणार म्हणजे देणार," असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 


कसा असणार धारावी मोर्चाचा मार्ग ?


- धारावी टी जंक्शन पासून मोर्चाला सुरूवात होईल


- त्यानंतर कलानगर जंक्शनच्या आधीच उजव्या बाजूने हा मोर्चा बीकेसीकडे जाईल


- सीएनजी पेट्रोल पंपापासून परिमंडळ 8 जवळून हा मोर्चा पुढे फटाका मैदान येथे थांबेल


- फटाका मैदान धारावी येथे सभा होईल 


 - या ठिकाणी नेते भाषण करतील