सचिन अहिर यांनी शिवसैनिकांना डावलल्यांने शिवसैनिक नाराज
शिवसैनिकांचं नाव गायब
मुंबई : सचिन आहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर स्थानिक शिवसैनिकांना वाटणारी भीती खरी ठरावी की काय अशी परिस्थिती समोर येत आहे. स्कूल बस उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम सचिन आहिर यांच्या पुढाकारानं आज जिजामाता नगरात घेतला जात आहे. त्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असून सचिन आहिर यांच्या श्री संकल्प प्रतिष्ठानच्या बॅनरखाली हा कार्यक्रम होतो आहे. मात्र या बॅनरवरून सचिन आहिर यांनी स्थानिक नगरसेवक अरविंद भोसले आणि खासदार अरविंद सावंत यांचं नाव पद्धतशीरपणे गायब केल्याची चर्चा विभागात सुरू झाली आहे.
सचिन अहिर राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईमधला चेहरा मानले जात होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेत जाणं हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का होता. तर मुंबईत शिवसेनेचं बळ त्यामुळे वाढलं आहे. सचिन अहिर यांनी घड्याळ सोडून शिवबंधन बांधलं आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत सचिन अहिर यांनी सहकुटुंब आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार असल्य़ाचं त्यांनी म्हटलं होतं.
भाजपाची मुंबईतली वाढती ताकद पाहता शिवसेनेलाही मुंबईतील ताकद वाढविण्यासाठी सचिन अहिर यांचा उपयोग होईल. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्षच आणि पक्षाचा मुंबईचा चेहराच शिवसेनेत गेल्यानं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मनोबल वाढण्यास मदत होईल.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सचिन अहिर यांचा पराभव झाला होता. मुंबईत राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही, पक्षाचे सुरूवातीपासून मुंबईकडे दुर्लक्ष, आगामी निवडणुकीबद्दल ठोस धोरण नाही, राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजयाची खात्री नाही या सगळ्या कारणांमुळे सचिन अहिरांनी राष्ट्रवादीला रामराम केला आहे. याचा शिवसेना आणि सचिन अहिर यांना नेमका काय फायदा होतो, ते विधानसभा निवडणुकीतच कळणार आहे.