भाजपच्या तिसऱ्या माणसाचे शिवसेनेला कौतुक
१० कोटी सदस्य संख्या असलेल्या या पक्षात विजय प्राप्त करून देणारे फक्त दोघेच नसून ‘तिसरा’ आदमीसुद्धा आहे.
मुंबई : भारतीय जनता पक्षाला विजय प्राप्त करून देणारी फक्त दोनच माणसे आतापर्यंत देशाला व जगाला माहीत होती. १० कोटी सदस्य संख्या असलेल्या या पक्षात विजय प्राप्त करून देणारे फक्त दोघेच नसून ‘तिसरा’ आदमीसुद्धा आहे. ‘तिसऱ्या’ आदमीचे आम्हाला कौतुक आणि अभिमान आहे!, असे कौतुकोद्गार शिवसेनेने भाजपला ईशान्येकडील राज्यात मिळालेल्या निवडणूक यशानंतर काढले आहेत.
कोण आहेत सुनील देवधर?
शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनामध्ये लिहिलेल्या लेखामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे कौतुकौद्गार काढले आहेत. ठाकरे यांनी हे कौतुगोद्गार सुनील देवधर यांच्याबद्धल काढले आहेत. सुनील देवधर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ईशान्येकडील प्रचारक आहेत.
काय म्हटले आहे सामनात?
'त्रिपुरातील विजय हा वाळवंटातून ‘केशरा’चे पंचवीस मण पीक काढल्यासारखे आहे. २०-२५ वर्षांची डाव्यांची सत्ता व स्वच्छ प्रतिमेचे ढोल पिटणारे माणिक सरकार यांचे सरकार उलथवून टाकणे सोपे नव्हते, पण ईशान्य भाजपची जी त्रिपुरी पौर्णिमा फुलली आहे त्यामागे सुनील देवधर व त्यांच्या टीमची किती अफाट मेहनत होती हे आता उघड झाले आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून मराठी सुभेदार सुनील देवधर यांनी त्रिपुरातील बंजर जमिनीत जे पेरले ते आता उगवले. फक्त सभा, भाषणे किंवा थापेबाजी करून मिळवलेला हा विजय नाही. देवधर व त्यांचे संघ विचाराचे कार्यकर्ते त्रिपुरात ठाण मांडून बसले. त्यांनी हल्ले व संकटांशी सामना केला, अशा शब्दात ठाकरे यांनी संघाच्या देवधरांचे कौतुक केले आहे.