सावधान, मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढले, निर्बंध पुन्हा लागणार?
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे.
मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत चालली आहे. मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार बुधवारी मुंबईत 295 नव्या रुग्णांची भर पडली आहे. बारा रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार होत आहे. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे.
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackarey ) यांनी राज्यातील जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे. कोविड रुग्णसंख्या वाढत असून यावर राज्य मंत्रिमंडळाने चर्चा केली.
राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख ( Aslam Shaikh ) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, कोरोना रुग्णांची संख्या मुंबईत वाढत आहे. जर याच प्रमाणात ही संख्या वाढत राहिली तर मुंबईत लवकरच निर्बंध लावण्यात येतील. १०० पासून आता रुग्णसंख्या ५०० पर्यंत वाढत आहे. अशीच रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा निर्बंधांची वेळ येईल, असे ते म्हणाले.