मुंबई: कोरोनासाठीचे हॉटस्पॉट, कंटेंटमेंट झोन आणि बाजारपेठा वगळून देशात सर्वत्र दुकाने सुरू करण्याच्या केंद्राच्या आदेशाची महाराष्ट्रात अंमलबजावणी होणार नाही. ३ मे पर्यंत जीवनावश्यक वस्तू वगळता राज्यातील सर्व दुकाने बंद राहतील, असे राज्य सरकारकडून शनिवारी स्पष्ट करण्यात आले. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात २० एप्रिलनंतर लॉकडाऊनमध्ये दिलेली शिथिलताच कायम राहील. महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढत‌ असल्याने सरकार कोणताही धोका पत्करायला तयार नाही. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात ३ मेपर्यंत दुकाने बंदच राहणार आहेत. 


टेन्शन कायम; धारावीत कोरोनाचे २१ नवे रुग्ण

केंद्र सरकारने शुक्रवारी रात्री उशिरा एक आदेश काढून देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत नोंदणीकृत दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे महाराष्ट्रातही महापालिका आणि नगरपरिषदांच्या हद्दीतील दुकाने सुरु होणार का, अशी चर्चा होती. मात्र, राज्य सरकारने तुर्तास कोणताही धोका न पत्कारण्याचे ठरवले आहे. केंद्र सरकारने सर्व दुकाने सुरु करायला परवानगी दिली असली तरी सलून, न्हाव्याची दुकाने, रेस्टॉरंट्स आणि दारूची दुकाने बंदच राहतील. 


३ मेपर्यंत राजस्थानमधील विद्यार्थी महाराष्ट्रात पोहोचतील - वडेट्टीवार


दरम्यान, मुंबई-पुणेकरांना ३मेनंतर आणखी १५ दिवस घरात थांबावं लागण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या ५१२ कंटेन्मेंट झोन आहेत. कोरोनाचे सर्वात जास्त हॉटस्पॉट या दोन शहरांमध्ये आहेत. त्यामुळे येत्या ४ मे रोजी देशातील लॉकडाऊन उठला तरी मुंबई आणि पुण्यातील निर्बंध १८ मेपर्यंत कायम राहण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तविली आहे. कोरोनाचा प्रसार रोखणे हे लॉकडाऊनचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखला जात नसेल तर  आपल्याला लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा लागेल, असे टोपे यांनी सांगितले.