मुंबई : पंतप्रधानांच्या सुरक्षेचे नियंत्रण गृहखात्यांतर्गत येणारे एसपीजी करत असते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या यंत्रणांचे प्रमुख आहेत. त्यामुळे शहा यांनी पंजाब येथे घडलेल्या त्या घटनेबद्दल उत्तर द्यावे अशा मागणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नाना पटोले यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी 15 दिवसांपूर्वीपासूनच सुरक्षेच्या सर्व व्यवस्था पाहिल्या जातात. तीन गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली जाते. त्याचं नियंत्रण एसपीजीकडे असतं. एसपीजी गृहखात्यांतर्गत येते. त्यामुळे गृहमंत्री अमित शाह यांनीच याबाबत उत्तर द्यावं असं पटोले म्हणाले. 


शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई, घसरलेली अर्थव्यवस्था, जीवनाश्यक वस्तूंचे वाढलेले दर, भाजपाशासित राज्यातील दलितांवरील अत्याचार यामुळे जनतेमध्ये भाजपाविरोधात प्रचंड संताप आहे.


तीन काळ्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून पंजाबातील शेतकरी एक वर्षापासून आंदोलन करत आहेत. आंदोलनादररम्यान 700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळं पंजाबमधील मोदींच्या सभेला 500 लोकंही आली नाहीत. मात्र, जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी पंतप्रधानानी हवाईदौरा सोडून रोडमार्गे स्वीकारला. 


पंतप्रधान मोदी यांना सभास्थळी जायचेच नव्हते. त्यामुळे रूपं बदलण्यात तरबेज असणाऱ्या पंतप्रधानांनी काल आपलं एक नविन रूप दाखवून नौटंकी केली, असा आरोप त्यांनी केला.  


पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी हि बाब समोर आणली असून पंजाब सरकारच्या चौकशीतून दूध का दूध पानी का पानी होईल. यातून पंतप्रधान आणि भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर येईल असे पटोले म्हणाले.


पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचा विश्वास घात केला. त्याला उत्तर देण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं आहे. हुकुमशाही वृत्तीच्या पंतप्रधानांची घमंड जिरवली. शेतकरी लढवय्या असून तुम्हाला सत्तेवरून पायउतार करून घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशाराही पटोले यांनी दिला.


सत्ता गेल्यापासून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे संतुलन ढळले आहे. त्यांनी वारंवार तोंड उघडायला लावू नका चे पोकळ इशारे देण्यापेक्षा एकदा तोंड उघडावेच म्हणजे त्यांच्या तोंडात किती हवा आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला कळेल असा टोलाही पटोले यांनी लगावला.