`भाजपतील महाराष्ट्रद्रोह्यांना रोखण्यासाठी `ते` नगरसेवक शिवसेनेत`
मुंबई महापालिकेतील शिवसेनेची म्हणजे मराठी माणसाची सत्ता उखडून फेकण्याची भाषा ‘भाजपा’तील काही महाराष्ट्रद्रोहय़ांनी करताच हे नगरसेवक शिवसेनेच्या भगव्या झेंडय़ाखाली एकवटले. आम्ही यास फाटाफूट, तोडफोड किंवा पक्षांतर वगैरे मानायला तयार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकाऊन सांगितले आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेतील शिवसेनेची म्हणजे मराठी माणसाची सत्ता उखडून फेकण्याची भाषा ‘भाजपा’तील काही महाराष्ट्रद्रोहय़ांनी करताच हे नगरसेवक शिवसेनेच्या भगव्या झेंडय़ाखाली एकवटले. आम्ही यास फाटाफूट, तोडफोड किंवा पक्षांतर वगैरे मानायला तयार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकाऊन सांगितले आहे.
मुंबई महापालिकेत असलेल्या मनसेच्या एकूण सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवकांना गळाला लावण्यात शिवसेनेला यश आले. त्यामुळे मुंबई महापालिकेत शिवसेनेची ताकत नक्कीच वाढली. पण, त्यामुळे पैशांचे आमिष दाखवून पक्ष फोडल्याचा आरोपही शिवसेनेवर झाला. या आरोपांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनामध्ये लेख लिहून उत्तर दिले आहे. या लेखात ठाकरे यांनी सत्ताधारी मित्रपक्ष भाजपवर टीकास्त्राचे बाण सोडले आहेत.
हा तर मराठी अस्मितेचा अपमान
मुंबई महानगरपालिकेतील सहा नगरसेवक एका चांगल्या विचाराने शिवसेनेत आले. त्यांच्यावर पैशाच्या अमिषाचा करणे हा ज्या मराठी अस्मितेसाठी त्या सहा नगरसेवकांनी निर्णय घेतला त्या मराठी अस्मितेचा अपमान आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
भाजपवर जोरदार टीकास्त्र
नोटाबंदीनंतर जनतेच्या जीवनात ‘मंदी’चा फेरा आला असला तरी एकाच पक्षात ‘चांदी’ आहे व त्यामुळेच मणीपूरपासून गोव्यापर्यंत लोकांनी झिडकारले असतानाही फक्त ‘पैसा’ हेच हत्यार वापरून सत्ता मिळवली गेली. इतकेच कशाला, शिवसेनेने लोकहिताच्या प्रश्नांवर पाठिंबा काढून घेतला तरी सरकार पडणार नाही अशा ज्या बतावण्या केल्या जातात त्या फक्त ‘बक्कळ’ पैशांच्या जोरावरच ना? मग अशा बतावण्या करणाऱ्यांविरोधात एखादा राजकीय भामटा त्या ‘ईडी’कडे तक्रार खरडवायला जात नाही हे आश्चर्यच म्हणावे लागेल. त्यावर कोणी काही बोलत नाही, पण इतरांनी सत्ता टिकविण्यासाठी काही जंतरमंतर केले तर ती मात्र फोडाफोडी ठरवली जाते, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
दरम्यान, शिवसेनेचे बळ वाढल्याचे दुःख काँग्रेस- राष्ट्रवादीस झाले नाही, पण ‘बक्कळ’ पैसेवाल्यांना ते झाले यातच सर्व काही आले, असा टोला लगावतानाच खुशाल करा तक्रारी! मराठी अस्मितेचा भगवा झेंडा मुंबईवर अखंड फडकतच राहणार आहे, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.