सोमय्या यांनी चंद्रावर, मंगळावर जाऊन आमच्या जमिनी शोधाव्यात, संजय राऊत यांचा टोला
किरिट सोमय्या यांच्यावरील कारवाईमागे मुख्यमंत्री कार्यालयाचा हात नसल्याचं स्पष्टीकरण शिवसेने दिलं आहे
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) विरुद्ध महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) असा सामना रंगला आहे. भाजप नेते किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाकरे सरकारमधील नेते आणि मंत्र्यांवर आरोप करण्याचा सपाटाच लावला आहे. मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारच्या पोलिसांनी मला बेकायदेशीर रित्या घरात डांबून ठेवलं तसंच कोल्हापूरकडे जाण्यास रोखलं असा आरोप केला आहे.
यावर किरीट सोमय्यांवरील कारवाईमागे मुख्यमंत्री कार्यालयाचा हात नाही असं स्पष्टीकरण शिवसेनेनं (shiv sena) दिलंय. कारवाई गृहमंत्रालयाने केल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलंय.
अलिबाग आणि जरंडेश्वर इथंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या व्यवहारांची माहिती घेणार असल्याचं किरिट सोमय्या यांनी म्हटलं आहे. यावर उत्तर देताना संजय राऊत यांनी सोमय्या यांना टोला लगावला आहे. किरिट सोमय्या यांनी चंद्रावर, मंगळवार जाऊन पाहणी करावी, आमच्या लोकांच्या जमिनी शोधाव्यात. या देशात लोकशाही आहे, त्यांना बोलायचा अधिकार आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
केंद्राच्या सूचनेनुसार आरोप करायचे तर करु द्या. पंतप्रधान मोदी, अमित शहांवरही आरोप होतात, सध्या आरोप करणं हे फॅशन झाली आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सोमय्या यांच्या आरोपाला फारसं गंभीरतने घेण्याची गरज नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राऊतांनी म्हटलं आहे की, मुख्यमंत्र्यावर आरोप करण्याचं कारण नाही. मुख्यमंत्री अशा लहान गोष्टीत पडत नाही. कोणी खोटे नाटे आरोप केले तर आमच्या सरकारला भोकं पडत नाहीत. तुमच्याकडे पुरावे असतील तर महाराष्ट्रात पोलीस आहे. तुम्ही केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर त्यांच्या यंत्रणांमार्फत प्रेशर करत असतील तर ते योग्य नाही, असं ते म्हणाले.