मोफीद खान, झी मीडिया, मुंबई :  रुग्णावाहिकेचा (Ambulance) सायरन ऐकून अनेकदा आपण घाबरतो. पण आता यापुढे मुंबईकरांना (Mumbaikar) हे दृश्य बदलताना दिसेल. काही रुग्णवाहिकांचे सायरन (Siren) एखाद्या नवजात बाळाच्या हसण्यासारखे वाजणार आहेत. आई आणि बाळांना आनंद देणारी 'खिलखिलाट रुग्णावाहिका सेवा' (Khilkhilat Ambulance Service) राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून सुरु होणार आहे. पुढच्या महिन्यापासून म्हणजे जून महिन्यापासून ही सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी खिलखिलाहाट रुग्णावाहिका सेवा सुरु केली होती. आता हीच सेवा मुंबईतही सुरु होणार आहे. या सेवेची घोषणा महिला आणि बाल कल्याण विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गेल्या महिन्यात केली होती. आता ही योजना प्रत्यक्षात उतरणार आहे. मुंबईत या सेवेला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर संपूर्ण राज्यात ही योजना लागू करण्याचा विचार सुरु आहे. 


सुरुवातीला 5 रुग्णवाहिका
महिला आणि बाल कल्याण विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा (MangalPrabhat Lodha) यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला 5 रुग्णवाहिका चालवल्या जाणार आहे. जुन महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईच्या रस्त्यांवर या रुग्णवाहिका धावताना दिसणार आहे. ही रुग्णवाहिका सेवा पूर्णपणे मोफत असणार आहे. विशेष म्हणजे या रुग्णावाहिकेतील वातावरण हे गर्भवती महिला आणि लहान मुलांना आनंददायी असणार आहे. 


या रुग्णवाहिकेचा वापर विशेषत: गरोदर महिलांसाठी केला जाणार आहे. याशिवाय लहान मुलांना रुग्णालयात दाखल करायचं असल्यास या रुग्णवाहिकेची मोफत सेवा दिली जाणार आहे. केवळ रुग्णालयात पोहोचवण्यासाठीच नाही तर आई आणि नवजात बालकाला रुग्णालयातून घरी आणण्यासही ही रुग्णवाहिला सेवेत असणार आहे. 


अशी आहे रुग्णवाहिका
रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज ऐकल्यावर अनेकांना भीती वाटते. गरोदर महिला आणि लहान मुलांवर या आवाजाचे परिणाम होतात. यासाठी नव्या रुग्णवाहिकेचा आवाज एका लहान मुलाच्या हसण्यासारखा ठेवण्यात आला आहे. रुग्णवाहिकेच्या आत आल्हाददायक चित्र आणि खेळणी ठेवली जाणार आहेत. रुग्णवाहिकेला बाहेरुनही रंगीत चित्र चिटकवली जाणार आहेत. नवजात बालकांच्या लसीकरणासंदर्भात या रुग्णवाहिकेत माहिती दिली जाणार आहे. याशिवाय तुम्ही राहात असलेल्या ठिकाणापासून आसपासच्या रुग्णालयांची माहिती पुरवली जाणार आहे. 


सेवेचे फायदे आणि तोटे
मानसोपचारतज्ज्ञ डॉ सागर मुंदडा यांनी या उपक्रमाचे फायदे आणि तोटे सांगितले आहेत. फायदा हा आहे की या रुग्णवाहिकेतून जाणाऱ्या मुलं किंवा गरोदर महिलांना सकारात्मक उर्जा मिळेल. पण याचा तोटा असा आहे की रुग्णवाहिकेचा आता असलेल्या आवाजामुळे इतर वाहनं रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करुन देतात. पण लहान मुलाच्या हसण्याच्या आवाजामुळे इतर वाहनचालकांना त्याचं गांभीर्य कळेल की नाही हा प्रश्न आहे. असं डॉ. मुंदडा यांनी म्हटलंय.