मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत विहिरी खोदून पाणीचोरी
लाखो लीटर पाणी बेकायदेशीररित्या......
मुंबई : मायानगरी, स्वप्ननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरातील एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या अत्यंत गजबजाट असणाऱ्या काळबादेवी परिसरात गेल्या काही वर्षांपासून विहिरी खोदत बेकायदेशीररित्या भूजलाचा उपसा करण्यात येत असल्याची बाब उघड झाली आहे. या पाण्याची विक्री करत आतापर्यंत कोट्वधींचा नफाही कमवण्यात आला आहे. बुधवारी दक्षिण मुंबईत असणाऱ्या काळबादेवी परिसरातील या घटनेप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
आरटीआय कार्यकर्ते सुरेशकुमार धोका यांनी आझाद मैदान पोलीसांकडे तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे पांड्या मेन्शन येथे कंपाऊंडच्या आत बेकायदेशीररित्या विहिरी खोदण्यात आल्या आहेत. इतकच नव्हे, तर त्यातून सतत पाण्याचा उपसा सुरु असल्याचीही माहिती मिळाली आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत हा सर्व प्रकार उघडकीस आला.
मेन्शनचा मालक त्रिपुराप्रसाद पांड्या हा कित्येक वर्षांपासून भूजलाचा उपसा करत टँकर वितरकांच्या माध्यमातून त्याची विक्री करत आहे. याकरता त्याने पाण्याचा उपसा करणाऱ्या पंपांसाठी बेकायदेशीररित्या वीजपुरवठ्याचाही वापर केल्याचं कळत आहे.
काळबादेवी परिसरातील या घटनेतील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे २००६ ते २०१७ या वर्षांमध्ये विक्री करण्यात आलेल्या लाखो लीटर पाण्यापासून तब्बल ७३.१८ कोटी रुपये इतकी कमाई करण्यात आली आहे.
पाणीचोरीविषयीची ही माहिती समोर येताच त्रिपुराप्रसाद पांड्या, प्रकाश त्रिपुराप्रसाद पांड्या, मनोज पांड्या, अरुण मिश्रा, श्रावण मिश्रा, धीरज मिश्रा आणि इतर काहीं व्यक्तींना आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्यावर भारतीय दंडविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम ३७९ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, सदर प्रकरणाचा पुढील तपासही सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.