दीपक भातुसे, मुंबई : पावसाळी अधिवेशनच्या तोंडावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉझिटीव्ह झाल्यानंतर सरकार पुढे हे अधिवेशन दोन दिवस सुरक्षित चालवण्याचे आव्हान आहे. राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि दोन दिवस एकाच ठिकाणी महाराष्ट्रातून येणारे आमदार आणि त्यांचे पीए, अधिकारी या गर्दीत अधिवेशन पार पाडण्याची कसरत सरकारला करावी लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. 3 सप्टेंबरला राज्यात सगळ्यात जास्त म्हणजे 18 हजार 105 रुग्ण आढळले. अशा परिस्थितीत मुंबईत दोन दिवसांचे विधिमंडळाचे अधिवेशन होत आहे. यासाठी सर्व मंत्री, आमदार, अधिकारी, पीए, पत्रकार यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. ज्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह येईल त्यांनाच अधिवेशनाला येता येणार आहे. त्यातच अधिवेशनाच्या तोंडावर मंत्री सुनील केदार कोरोना पोझिटीव्ह आले आहेत. तर राज्यात आतापर्यंत साधारणपणे 35 हून अधिक आमदार, मंत्र्याना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातून काही बरे झाले तर काहींवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे अधिवेशनातही विशेष काळजी घेतली जाणार आहे. 


सर्व आमदार सभागृहात बसले तर अंतर राखणं शक्य होणार नाही. त्यामुळे काही आमदारांची व्यवस्था प्रेक्षक गॅलरी आणि अधिकारी गॅलरीत करण्यात आली आहे. तर आमदारांच्या पीएंसाठी विधानभवनच्या बाहेर मंडप टाकून तिथे त्यांची थांबण्याची व आहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिवेशन घेण्यासाठी जी बैठक झाली त्या बैठकीत प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांना विशेष सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार ज्या आमदारांना इतर आजार आहेत त्यांनी अधिवेशनाला येऊ नये याची काळजी त्या-त्या पक्षांनी घ्यायची आहे.


काही आमदार मुंबईतील रुग्णसंख्या बघता अधिवेशनाला येणं टाळण्याची शक्यता आहे. तर काही आमदार कोरोना असला तरी मतदारसंघातील आणि राज्यातील प्रश्न सोडवणे महत्त्वाचे असल्याचं सांगत अधिवेशनाला यावं लागेल अशी भूमिका मांडत आहेत.


कोरोनामुळे पावसाळी अधिवेशन दोन वेळा पुढे ढकल्यानंतर अखेरीस 7 आणि 8 सप्टेंबर रोजी अधिवेशन होणार आहे. मंत्री, आमदार, त्यांचे पीए, शासकीय अधिकारी यांच्या गर्दीत अधिवेशनात कोणाला कोरोनाची बाधा होऊ नये हेच मोठे आव्हान असणार आहे.