COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमित जोशी, झी मीडिया, किल्ले माहुली : राकट देशा कणखर देशा महाराष्ट्र देशा... अशा या महाराष्ट्रात सह्याद्रीच्या डोंगररांगांमधले  विविध किल्ले खड्या चढाईमुळे आजही  दुर्गमच आहेत. असाच एक किल्ला म्हणजे आसनगावजवळचा माहुली किल्ला. चढायला प्रचंड अवघड पण एक गिर्यारोहक या किल्ल्याच्या अक्षरशः प्रेमात पडलाय.  कल्याणचे विलास वैद्य यांनी 
डोंगरभ्रमंती करतांना १९९४मध्ये  त्यांनी पहिल्यांदा माहुली किल्ल्यावर पाऊल ठेवलं आणि ते माहुलीच्या प्रेमातच पडले. त्यानंतर मग माहुली किल्ल्यावर वेगवेगळ्या ऋतुंमध्ये, वेगवेगळ्या वाटेने चढाई करण्याचा सपाटाच त्यांनी लावला. किल्ल्यावर जाणारा एकही मार्ग विलास यांनी सोडला नाही. मग त्यांनी माहुलीवर साफसफाई करायला सुरुवात केली. यानिमिताने किल्ल्यावरच्या धान्य कोठारासारख्या वास्तू ज्या काळाच्या ओघात झाडांमध्ये लपल्या होत्या त्या विलास वैद्य यांनी शोधून काढल्या. प्रत्येक मोहिमेच्या वेळी ते नव्या गिर्यारोहकांना सोबत घेऊन गेले. पाहता पाहता त्यांनी माहुली सर करण्याची शंभरी पार केली. दरवेळी चढाईनंतर हा किल्ला नवी उर्जा देतो.


माहुली किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे शहाजी राजे, जिजामाता आणि बाल शिवाजी यांचा एकत्र सहवास या किल्ल्याने अनुभवला...मिरवला.... छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह करतांना या माहुली किल्ल्याचे तीन भाग करत ते मुघलांना दिले आणि स्वराज्याचे दोन किल्ले वाचवले. त्यानंतर हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न करतांना एक मोठा पराभवही महाराजांना याच किल्ल्याने दाखवला. एवढा इतिहास असतांनाही माहुली किल्ला आज दुर्लक्षित आहे.


विलास वैद्य यांनी आता पन्नाशी गाठलीय. पण जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत माहुलीची चढाई सुरू ठेवणारच, असा त्यांचा निर्धार आहे. आतापर्यंत त्यांनी राज्यातले इतर दीडशे किल्ले पायथे घातलेत. विलास वैद्य यांच्यासारखे किल्ल्यांचं आणि इतिहासाचं वेड रक्तात घेऊन हिंडणारे गिर्यारोहक आहेत, म्हणूनच या राकट महाराष्ट्रात किल्ले आणि इतिहास जीवंत आहे.