दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : शाखाप्रमुख होण्यासाठी तो पहिल्यांदा मातोश्रीवर गेला..... त्यानंतर मातोश्रीनं त्याला सोडलंच नाही..... गेल्या पंचवीस वर्षांत मातोश्रीवर ब-याच घडामोडी घडल्या..... पण हा माणूस हुकमाच्या एक्क्यासारखं मातोश्रीवरचं वजन टिकवून आहे.... नाव आहे, मिलिंद केशव नार्वेकर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजपर्यंत भल्याभल्यांना हे रसायन काय, ते ओळखता आलेलं नाही.....राजकारण म्हणा, खेळ म्हणा, व्यवसाय म्हणा... बॉलिवूड म्हणा... असं एकही क्षेत्र नाही, जिथे मिलिंद यांचा मुक्त वावर नाही.... अगदी अंबानींच्या घरापासून ते पंतप्रधान कार्यालयापर्यंत.... त्यांचा मुक्त संचार असतो... नार्वेकरांच्या घरचा गणपती पावतो, असं म्हणत मुख्यमंत्रीही त्याच्या घरी गणपतीला जातात.....काल परवापर्यंत उद्धवचा पीए असलेले मिलिंद नार्वेकर आता शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर झालेत... त्यांचा हा प्रवास थक्क करणारा.... 


शिवसेनेतून आजतागायत जो जो बाहेर पडला, त्यानं मिलिंद नार्वेकरांवर निशाणा साधला... अगदी राज ठाकरेंनी सुद्धा..... माझ्या विठ्ठलाला बडव्यांच्या चांडाळचौकडीनं घेरलंय, या वाक्यातल्या चांडाळचौकडीतले एक मिलिंद नार्वेकरच....मिलिंद मुळात साधा शिवसैनिक.... मालाडमधल्या लिबर्टी गार्डन भागातला एक गटप्रमुख....शाखाप्रमुखपद मिळावं म्हणून 1992 च्या निवडणुकांआधी मिलिंद मातोश्रीची पायरी चढले आणि मातोश्रीचेच झाले.....


हुशार, चुणचुणीत आणि स्मार्ट मिलिंद उद्धवना भेटले.... फक्त शाखाप्रमुख व्हायचंय, की आणखी काही जबाबदारी घ्यायचीय, असं उद्धवनी विचारताच तुम्ही सांगाल ते, असं उत्तर मिलिंदनं दिलं... मग उद्धव ठाकरेंसाठीचे फोन अटेण्ड करणं, डायरी आखणं, हे सगळं काम मिलिंदकडे आलं... बाळासाहेबांना लोकांना भेटायला आवडायचं... त्याउलट उद्धव ठाकरे कुटुंब, फोटोग्राफीत रमायचे.... अशा वेळी शिवसेनेच्या पदाधिका-यांना, आमदार-खासदारांना भेटण्याचं आणि प्रसंगी कटवण्याचं काम मिलिंद यांच्याकडे असायचं.... हळूहळू मिलिंद उद्धव यांच्या गळ्यातला ताईत झाला.


उद्धवच्या सगळ्या अपॉईण्टमेंट मिलिंद ठरवायचे.... तेव्हापासूनच मिलिंदविरोधात ब्र उच्चाण्याची कुणाची हिम्मत नव्हती... मिलिंदकडून आर्थिक गैरव्यवहार होतात, असा आरोप राणेंनी केला... त्यावेळची परिस्थिती पाहता मिलिंद यांची हकालपट्टी होईल, अशी परिस्थिती होती.... पण उलट मिलिंद यांचं मातोश्रीवरचं वजन वाढतच गेलं..... मिलिंद यांची राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही... आता तर ते पक्षाचे सचिव झालेत.... अर्थात बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला हा निर्णय फारसा रुचला नसेल...... पण उद्धव यांची ढाल म्हणून उभे राहणारे मिलिंद विधानपरिषद निवडणुकीवेळी मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारासाठी पोलिंग एजंट म्हणूनही काम करतात... आता पक्षाचे सचिव झाल्यावर मिलिंद विधीमंडळात कधी दिसणार, याची उत्सुकता आहे.



प्रत्येक पक्षाला मिलिंद नार्वेकरसारखं कुणीतरी लागतंच.... पण एकाच वेळी पक्षप्रमुखांच्या गळ्यातला ताईत असणं आणि इतरांसाठी उपद्रवाचं कारणही असणं, हे मिलिंदच्याच बाबतीत होत असावं.... राजकारणात खलनायक आणि नायकही असतात... पण खलनायक असूनही नायक होणारा कदाचित मिलिंदच असावेत.....