`एसआरए`मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणार, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाडांची घोषणा
देशभरात कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला आण त्यातही मुंबईला बसला आहे.
मुंबई : देशभरात कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला आण त्यातही मुंबईला बसला आहे. मुंबईतल्या दाटीवाटीच्या वस्तीतल्या लोकसंख्येमुळेही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जगातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्येही कोरोनाने थैमान घातलं. यानंतर आता राज्य सरकारने एसआरए प्रकल्पांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
यापुढे एसआरएच्या प्रत्येक प्रकल्पामध्ये झोपडपट्टी धारकांच्या प्रकृतीची काळजी म्हणून १ हजार ते ५ हजार स्क्वेअरफूटचे प्राथमिक आरोग्य केंद्र फ्री ऑफ एफएसआय बेसिसवर बांधण्याचा निर्णय एसआरएने घेतला आहे, अशी घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. याबाबतचं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.
कोरोना झालेल्या रुग्णांना उपचार घेताना अडचणी समोर येत असल्याचं दिसून येत आहे. कोरोना काळात सरकारी रुग्णालयांवर रुग्णसंख्येमुळे मोठा ताण येत आहे. तर खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे आकरले जात आहेत. त्यामुळे भविष्यातील उपाययोजना म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या निर्णयाकडे पाहिलं जात आहे.