लालपरीची कमाल... तब्बल दीड लाख मजुरांना सीमेपर्यंत सोडले
११ हजार ३७९ बसेस मधून १ लाख ४१ हजार ७९८ मजुरांचा प्रवास
मुंबई: महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी गेल्या काही दिवसांपासून गावाकडे पायी चालत निघालेल्या मजुरांच्या मदतीला धावून येताना दिसत आहे. आतापर्यंत एसटीकडून या मजुरांसाठी ११, ३७९ बसेस सोडण्यात आल्या. या बसेसमधून जवळपास १,४१,७९८ कामगारांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सोडण्यात आले आहे. यामध्ये मध्यप्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक यासारख्या राज्यांतील मजुरांचा समावेश आहे.
कोरोनामुळे मृत पावलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना मिळाली नोकरी
सध्या रेल्वेकडून स्थलांतरित मजुरांसाठी विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जात आहेत. मात्र, सोशल डिस्टन्सिंगचे नियम लक्षात घेता या गाड्यांतून मर्यादित कामगारच प्रवेश करु शकतात. तसेच या प्रवासासाठी लागणारे तिकिटाचे पैसेही अडचणीचा मुद्दा आहे. त्यामुळे अनेक स्थलांतरित मजूर पायीच आपल्या गावी चालत निघाले आहेत. परंतु, या मजुरांना प्रचंड हालअपेष्टांचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्यासाठी एसटी बसेस सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता स्थलांतरीत मजुर आणि कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवले जात आहे. तसेच इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना राज्यात आणण्याचे ही काम केले जात आहे.
श्रमिक रेल्वेने २ लाखाहून अधिक मजूर आपल्या राज्यात परतले
महाराष्ट्रात अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी सुरु केलेल्या श्रमिक रेल्वे सेवेच्या माध्यमातून आतापर्यंत १९१ रेल्वेगाड्यातून २ लाख ४५ हजार ०६० स्थलांतरीत कामगारांना सुखरूप त्यांच्या राज्यात पोहोचवण्यात आले आहे. परराज्यातील कामगारांना त्यांच्या राज्यात सकुशल पाठविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्यांच्या तिकिटासाठी ५४ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला गेला आहे.