मुंबई : एसटी महामंडळातील १ लाख १० हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेट देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना २ हजार ५०० तर अधिकाऱ्यांना ५ हजार रुपये इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यात येणार आहे. आचारसंहिता अद्यापही असल्याने याबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येण्याची घोषणा परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र व राज्यशासनाप्रमाणे ३ टक्के महागाई भत्ता १ जानेवारी २०१९ पासून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी ऑक्टोबरच्या वेतनामध्ये ३ टक्के महागाई भत्ता देण्याची येण्याची माहिती मिळत आहे. जानेवारी २०१९ ते सप्टेंबर २०१९पर्यंतचा थकित महागाई भत्ता देण्याबाबतचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.


दिवाळीत प्रवाशांची गर्दी विचारात घेता एसटी महामंडळातर्फे २४ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत ३ हजार ५०० ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत. 


महसुलवाढीच्या दृष्टीने ३० टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे या हंगामातही १० टक्के भाडेवाढ २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. ही भाडेवाढ ५ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहील.