ST Strike । एसटी कर्मचाऱ्यांची पगार कपात? कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना फटका
ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांबाबत महत्वाची बातमी. मिळालेल्या माहितीनुसार एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात होण्याची शक्यता आहे. याचा फटका कर्तव्यावर असणाऱ्या एसटीच्या कर्मचार्यांना बसणार आहे.
मुंबई : ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांबाबत महत्वाची बातमी. मिळालेल्या माहितीनुसार एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात होण्याची शक्यता आहे. याचा फटका कर्तव्यावर असणाऱ्या एसटीच्या कर्मचार्यांना बसणार आहे. संपकाळातील नुकसान भरुन काढण्याचा महामंडळाचा प्रस्ताव असल्याचे समजते आहे.
दरम्यान, ST कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याबाबत आज मंगळवारी होणाऱ्या न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष आहे. त्यानंतरच पगार कपातीचा हा प्रस्ताव अमलात येईल, असे सांगण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाला मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावे लागले आहे.
ST कर्मचारी संपात सहभागी झालेले आणि नंतर कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करुन तोटा भरुन काढण्याचा धक्कादायक प्रस्ताव एसटी महामंडळाच्या विचाराधीन आहे. एसटी कर्मचारी संघटनांकडूनही नुकसानाची वसुली करावी, असेही प्रस्तावात नमूद म्हटल्याचे सांगण्यात येत आहे.
पगार कपातीचा प्रस्ताव पुढे आल्याने कर्मचाऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होते आहे. पगार कपातीला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यां विरोधात अहवाल असल्यास अनेक आगारातून अंशत: सुरु झालेली वाहतूक पुन्हा बंद होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
दरम्यान, एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. हा संप अद्याप सुरुच आहे. काही कर्मचारी कामावर रुजू झाले तरी अद्यापही अनेक कर्मचारी संपात सहभागी आहेत. एसटीची सेवा पूर्णपणे सुरु झालेली नाही. त्यातच पगार कपातीचे वृत्त आल्याने कर्मचाऱ्यांत चुळबूळ सुरु झाली आहे.
गेल्या तीन महिन्यात महामंडळाला 1600 कोटी रुपये नुकसान झाले आहे, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे. आज मंगळवारी होणाऱ्या न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष असून त्यानंतरच पगार कपातीचा हा प्रस्ताव अमलात येईल, असे एसटीतील सूत्रांनी सांगितले.