शुभांगी पालवे, झी मीडिया, मुंबई : एकीकडे देशात बुलेट ट्रेन सुरू मारण्याच्या गप्पा होतायत... तर दुसरीकडे एखाद्या स्टेशनचं नाव बदललं की झालं? नागरिकांच्या सुरक्षिततेचं, सोई-सुविधांचं काय? असा संतप्त सवाल नागरिकांनी आजच्या एलफिन्स्टन चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर निर्लज्ज बनलेल्या आणि निर्ढावलेल्या सत्ताधाऱ्यांना केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्याच जुलै महिन्यापासून एलफिन्स्टन स्टेशनचं नाव बदलून 'प्रभादेवी' करण्यात आलंय. यासाठी शिवसेनेनं चांगलाच जोर दिला होता. 


पश्चिम रेल्वे मार्गावर असणाऱ्या एलफिन्स्टन स्टेशनचं नाव मुंबईचे गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्या गौरवार्थ ठेवण्यात आलं होतं. एलफिन्स्टन स्टेशन परेल स्टेशनला एका पादचारी पुलाच्या साहाय्यानं जोडण्यात आलेलं आहे. या स्टेशनचं नाव बदलण्याची मागणी शिवसेना नेत्यांनी १९९१ पासून लावून धरली होती... आणि ती २०१७ साली पूर्णही झाली. 


या स्टेशनला असणाऱ्या रेल्वे ब्रिजची रुंदी वाढवण्यात यावी, अशी मागणीही सातत्यानं नागरिकांकडून होत होती... ही मागणी मात्र कुणाच्याही कानी पडली नाही... नागरिकांना भूलथापा देऊन खुश करण्यासाठी भाजप सरकारनं केवळ या स्थानकाच्या नामकरणाला परवानगी दिली... आणि आज जे घडायला नको होतं तेच घडलं... मुंबईची 'लाईफलाईन' रेल्वे प्रवाशांसाठी 'डेडलाईन' ठरली.


शुक्रवारी सकाळी पावसामुळे उडालेल्या गोंधळात आणि चेंगराचेंगरीत तब्बल २२ निरपराध लोकांनी आपला जीव गमावला... याला जबाबदार कोण? केवळ स्टेशनचं नाव बदलून विकास साधता येतो का? स्टेशनचं नाव बदलल्यानं सगळे प्रश्न सुटतात का? असा सवाल संतप्त नागरिकांनी सत्ताधाऱ्यांना केलाय.