स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची चौकशी संपली; पुढे काय ? जाणून घ्या
शिवसेना उपनेते आणि मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील निवासस्थानी आयकर विभागाची सुरु असलेली चौकशी संपलीय. शुक्रवार सकाळपासून आयकर विभागाचे (Income Tax Raid) अधिकारी जाधव यांच्या घरी तळ ठोकून होते.
मुंबई : शिवसेना उपनेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या माझगाव, ताडवाडी येथील घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळपासून चौकशी सुरु केली होती. सलग 72 तासाच्या चौकशीनंतर सकाळी आयकर अधिकारी त्यांच्या घरातून निघाले आहेत. तब्बल चार दिवसांनंतर या चौकशीला ब्रेक लागला आहे.
यशवंत जाधव यांच्या घरातून आयकर विभागाने याआधीच 2 कोटी रुपये रोख रक्कम जप्त केलीय. तर, आयकर विभागाने आतापर्यंत 33 ठिकाणी झाडाझडती केली असून महत्त्वपूर्ण कागदपत्रे, सोबतच लॅपटॉप, हार्ड डिस्क, स्कॅनर आदी डिजिटल साधने ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय.
यशवंत जाधव हे गेली पाच वर्ष मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आहेत. भाजप नेते किरीट सोमैया यांनी यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटी रुपयांचा घोटाळा करून ही रक्कम यूएईला हलवल्याचा आरोप केला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी परिवार एकाच हवाला ऑपरेटरच्या माध्यमातून आपले बेनामी पैसे वळवत असल्याचा गंभीर आरोपही सोमय्यांनी केला होता. एवढंच नव्हे तर त्यांच्यासाठी मनी लाँड्रिंग करणारा माणूस एकच असल्याचा सनसनाटी गौप्यस्फोटही सोमय्यांनी केला होता.
यशवंत जाधव यांच्यावरील कारवाईवरुन केंद्र सरकार सूड भावनेने कारवाई करत असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केला होता. मात्र, 72 तासांच्या सलग चौकशीनंतर आयकर विभागाचे अधिकारी जाधव यांच्या घरून निघाल्याने पुढे काय होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.