मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या चौदा दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. मुंबईच्या आझाद मैदानात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात संपकरी कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. एसटी संपावर चर्चा करण्यासाठी सरकारकडून आमंत्रण आल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. कर्मचारी मागे हटत नाहीत म्हणून आम्हाला चर्चेचं आमंत्रण दिल्याचा दावा पडळकर यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला पाझर फुटला आहे का, न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे का, याबाबत आम्ही सरकारशी चर्चा करणार असल्याचं पडळकर यांनी म्हटलं आहे. 5 महिला आणि 5 पुरुष असं आमचं शिष्ठमंडळ भेटीसाठी जाणार असल्याचंही पडळकर यांनी म्हटलं आहे.


आमची विलीनीकरणाशिवाय दुसरी मागणी नाही, या प्रश्नावर सरकार काय भूमिका घेतं हे आज आम्हाला कळेल, रोज त्यांच्या बैठका सुरु आहेत, पण ठोस भूमिका घेत नाहीए, सरकारने अनेक प्रयत्न केले वेळकाढूपणाचा, चालढकल करण्याचा, कर्मचारी कंटाळून मैदानातून जातील, आमदारही इथून जातील. सरकारने पोलीस बळाचा वापर केला, सेवा समाप्तीच्या नोटीसा दिल्या, निलंबनाच्या नोटीसा दिला. पण कर्मचारी त्यांच्या मागण्यांवरुन हटत नाहीत., हे जेव्हा सरकारच्या लक्षात आलं, तेव्हाच सरकारने आम्हाला चर्चेचं निमंत्रण दिल्याचं पडळकर यांनी म्हटलं आहे.


अधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही, मंत्र्यांबरोबरच चर्चा होणार, निर्णय घेण्याची ज्यांची क्षमता आहे, अधिकार आहेत, अशा लोकांबरोबरच चर्चा करण्यात अर्थ आहे. जोपर्यंत सरकार अधिकृत बोलत नाही, नुसतीच चर्चा झाली, सकारात्मक आहे, ही केवळ आश्वासनं झाली, तोपर्यंत आम्ही विश्वास ठेवणार नाही, असंही पडणकर यांनी म्हटलं आहे.


आम्ही इशारा दिल्यानंतर निमंत्रण आलेलं आहे, विलीनीकरणाच्याबाबतीत सरकारचं धोरण काय आहे, हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचं पडळकर यांनी स्पष्ट केलं आहे.