मुंबई : राज्यात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्याची घोषणा रविवारी करण्यात आली. राज्य सरकारने जारी केलेला लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज १७ मे रोजी संपत आहे. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सोमवार 18 मेपासून सुरु होणार आहे. मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल यांनी मुंबईकरांना आवाहन केलं आहे. मुंबईकराना विनंती आहे की, एवढे दिवस मेहनत घेतली आहे, आता आणखी काही दिवस घरी राहा, असं आवाहन त्यांनी मुंबईकरांना केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी सायन रुग्णालयाची पाहणी केली असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. येथील आयसीयू, कोविड वॉर्डची पाहणी केली. काही सुधारणा गरजेच्या आहेत का त्याची पाहणी करत आहोत. मुंबईतील रुग्णालयात जेथे आयसीयू आहेत, तेथे सीसीटीव्ही लावणार येणार आहेत. त्याशिवाय कंट्रोल रुममध्येही देखरेख ठेवली जाणार असल्याचं आयुक्त म्हणाले.


रुग्ण वाढीचा रेट हा 14.5वर आला आहे. केंद्र सरकारकडून सांगण्यात आलेले सर्व नियम पाळण्यात येत आहेत. 7 दिवसात रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर आता अशा रुग्णांना डिस्चार्ज देणार आहोत. त्यामुळे रुग्णालयात बेड उपलब्ध होतील, अशी माहिती चहल यांनी दिली.


राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढला


कोरोनाविरोधातील हा लढा अंतिम टप्प्यात आहे. आपल्याला नक्की यश मिळेल. आता आपण कंटेन्मेंट झोनमध्ये कडक पावलं उचलली आहेत असंही आयुक्त म्हणाले.


दरम्यान, चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये रेड झोनमधील भागात सध्यातरी कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही. मात्र कन्टेंन्मेट झोन वगळता इतर भागात व्यवहार सुरु केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये आधीच्या लॉकडाऊनप्रमाणेच नियमांचं पालन करत काही दुकानं, व्यवहार सुरु राहणार आहेत. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये कशाप्रकारे नियम असतील, कोणत्या भागात किती प्रमाणात शिथिलता दिली जाईल याबाबत लवकरच सविस्तर आदेश जाहीर करण्यात येणार आहेत. आदेशानुसार त्या-त्या भागात नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.