मुंबई : अनधिकृत बांधकामांवर मुंबई पालिकेने (Mumbai Municipal Corporation)  युद्ध पातळीवर तातडीने कारवाई करावी, यामध्ये कोणाचाही दबाव सहन करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) बैठकीत सूचना दिल्या. मुंबई हे देशातलं सुंदर आणि स्वच्छ बनवण्यासाठी मैदानात उतरा असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूर्व आणि पश्चिम महामार्गालगत देखील मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकल्या जातात असे निदर्शनास आले आहे, याठिकाणी कॅमेरे लावून जे हे करीत असतील त्यांच्यावर तातडीने कारवाई करा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या बैठकीत पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल, सहायक आयुक्त, उपायुक्त, प्रभाग अधिकारी, पालिका रुग्णालयांचे वैद्यकीय अधिष्ठाता तसंच टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित होते.


मुंबईत अनधिकृत बांधकामं (Unauthorized Construction) सहन केली जाणार नाही, असे निर्देश देत प्रभाग अधिकाऱ्यांनी अतिशय जागरूकपणे आणि कर्तव्यकठोरपणे यावर तातडीने कारवाई करावी, कुणाचाही दबाव आला तरी सहन करू नका आम्ही आपल्या पाठीशी आहोत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.


तातडीने युद्ध पातळीवर कारवाई करा, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मुंबईतील रस्ते दुरुस्ती कामांची निविदा प्रक्रिया व्यवस्थितपणे आणि पारदर्शक पद्धतीने करा, कुणालाही बोट उचलण्याची संधी मिळाली नाही पाहिजे हे पहा असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.