प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई  : मुंबईच्या धकाधकीचा असाच एक दिवस..... घाटकोपरला राहणारे केशव शिरसाट 305 नंबरच्या बसमध्ये चढले.... तेवढ्यात त्यांना एक फोन आला आणि त्यामुळे घाटकोपर डेपोला न जाता ते पंतनगरलाच उतरले.... फोनच्या गडबडीत बॅग बसमध्येच राहिली..... ज्या क्षणी हे जाणवलं, त्या क्षणी पायाखालची जमीनच सरकली.....  बॅगेत दोन लाख रुपये होते.... त्या पैशांमधून बहिणीचं लग्न करायचं होतं.... बसचा नंबर, मार्ग काहीच माहीत नव्हतं... बॅग गेली, पैसे गेले.... आता शिल्लक राहिली होती ती हतबलता आणि बहिणीच्या लग्नाची चिंता.... 


बसमध्ये सापडली बॅग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे 305 नंबरच्या बसचा पुढचा प्रवास सुरू होता....बसचे कंडक्टर होते गोकुळ राठोड.... त्यांना एका सीटवर राहिलेली बॅग मिळाली... बॅगेतले दोन लाख रुपयेही मिळाले.... मोह निर्माण होण्याचा हाच तो क्षण आणि हीच ती वेळ.... पण तो मोह नाकारुन गोकुळ यांनी ती बॅग रीतसर आगारात जमा केली...... बॅगेतल्या कागदपत्रांवरुन केशव शिरसाट यांचा नंबर मिळाला...


...आणि फोन वाजला


केशव शिरसाट यांचा फोन वाजला.... घाटकोपर बस आगारातून आलेला तो फोन होता बॅग सापडल्याचा..... मग पुढचं सगळं सोपं आणि सुरळीत झालं.... शिरसाट आगारात पोहोचले, बॅग मिळाली, दोन लाखही मिळाले..... गोकूळ राठोडच्या प्रामाणिकपणाची दखल घेत बेस्ट समितीचे अध्यक्ष  अनिल कोकीळही घाटकोपर आगारात पोहोचले... त्यांच्या हस्ते गोकुळचा सत्कार झाला... 


बहिणीच्या लग्नाचे सनई-चौघडे वाजायला लागले


माणूस पैशानं नाही विश्वासानं मोठा होतो, यावर गोकुळ राठोड यांचा प्रचंड विश्वास.... त्यामुळेच दोन लाखांमधला एक नया पैसाही इकडचा तिकडे झाला नाही...... आता शिरसाटांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे... बहिणीच्या लग्नाचे सनई-चौघडे वाजायला लागलेत...