शिक्षणाच्या आयचा घो! शिक्षण विभाग इकडे लक्ष देईल का? नालासोपाऱ्यात विद्यार्थी शिकतायत झाडाखाली
एकीकडे तळागाळातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याच्या बाता करायच्या आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या मुलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नालासोपाऱ्यात शिक्षणाची बिकट अवस्था
Mumbai News : वसई विरार शहरात (Vasai-Virar) एकीकडे खाजगी अनधिकृत शाळांचे (Unauthorized School) पीक वाढत चाललं आहे. याकडे शिक्षण विभाग (Education Department) दुर्लक्ष होत आहे. तर दुसरीकडे सरकारच्या जिल्हा परिषद शाळेतील (ZP School) विद्यार्थ्यांना चक्क झाडाखाली बसून शिक्षण घेण्याची वेळ आलीय. पावसाळ्यापासून गेले तब्बल चार महिने ही मुलं उघड्यावर झाडाखाली बसून शिक्षणाचे धडे घेत आहेत. मात्र त्यांच्या या गैरसोयीचं शिक्षण विभागाला कोणतंही सोयरं सुतक दिसून येत नाहीये.
झाडाखाली विद्यार्थ्यांचं शिक्षण
झाडाला टांगलेले बॅनर, समोर ठेवलेला फळा, आणि मधल्या सुट्टीत गावभर फिरणारे विद्यार्थी. हे दृष्य कोणत्याही गावखेड्यातील नाही, तर मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नालासोपारा भागातील आहे. नालासोपाऱ्यातील (Nalasopara) पेल्हार भागातील जिल्हा परिषेदच्या मानपाडा शाळेची ही दुर्देवी अवस्था. या शाळेचे बांधकाम जून महिन्यात मोडकळीस आल्याने गेल्या पावसाळ्यापासून या शाळेत शिकत असलेले 110 विद्यार्थी हे उघड्यावर शिक्षण घेत आहेत.
शिक्षण विभागाचं दुर्लक्ष
खरंतर शिक्षण विभागाने या मुलांची छत असलेल्या पर्यायी सोय करणे गरजेचं होतं. मात्र याकडे दुर्लक्ष करत विद्यार्थ्यांना झाडाखालीचं बसवून शिक्षण दिले जातं आहे. त्यामुळे धुळीचा लोट, झाडाचा पडणारा पाला आणि आता कडाक्याच्या थंडीत या मुलांना मोकळ्या जागेतच बसावं लागत आहे.
हे ही वाचा : ती मी नव्हेच! मृत घोषित केलेली अभिनेत्री वीणा कपूर जिंवत, पोलीसांकडे घेतली धाव
ग्रामस्थानी घेतला पुढाकार
या मुलांना बसण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचं कारण शाळेने दिल्याने ग्रामस्थांनी पुढाकार घेत त्यांना झाडाखाली जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र या मुलांना उघड्यावर शिक्षण देणं हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न या निम्मिताने उपस्थित केला जातं आहे. या मुलांना प्रशासनाने लवकरात लवकर शाळेची सोय करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत..
हे ही वाचा : समुद्रात पोहताय? सावधान ! जेली फिशनं गीताचं उद्ध्वस्त केलं करियर
झी 24 तासने हा प्रकार जेव्हा शिक्षण अधिकरी आणि गट विकास अधिकाऱ्यांच्या कानावर टाकला तेव्हा हे दोघेही या प्रकारबाबत अनभिज्ञ होते. जिल्हा परिषदेत शिकणारे विद्यार्थी गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून वाऱ्यावर शिक्षण घेत आहेत. याबाबत त्यांना कोणतीही कल्पना नव्हती. त्यामुळे शिक्षण विभाग खरंच मुलांच्या भविष्याबाबत विचार करीत आहे का? असा प्रश्न उपस्थित होतं आहे..
वसई पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रदीप डोलारे यांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी मानपाडा शाळेच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत मुलांना तातडीने छताची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.