कांदा खरेदीवर अखेर तोडगा, कृषी मंत्र्यांची माहिती
कांदा खेरदीवर अखेर तोडगा निघालाय. त्यामुळे उद्यापासून व्यापारी कांदा खरेदी करणार आहेत.
मुंबई : कांदा खेरदीवर अखेर तोडगा निघालाय. त्यामुळे उद्यापासून व्यापारी कांदा खरेदी करणार आहेत. मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत हा तोडगा निघाला आहे. कांद्याची साठवणुकीची मर्यादा वाढवण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्र सरकारसोबत चर्चा करणार असल्याचं कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. तर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यामुळे उद्यापासून कांदा खरेदी करणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
केंद्राच्या धोरणामुळे नाराज व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी बंद केली होती. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला होता. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी, राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू होते.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः पुढाकार घेत नाशिकमधले कांदा उत्पादक आणि कांदा व्यापारी यांच्याशी चर्चा केली होती. मात्र त्यानंतरही कांदा व्यापाऱ्यांचं तळ्यात मळ्यात धोरण दिसलं होतं. मात्र मुख्यमंत्री चर्चेनंतर अखेर प्रश्न सुटल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.