मुंबई : राज्यात साखरेच्या भावाने उचल खाल्ली आहे. अचानक दरवाढ झाल्याने घाऊक व्यापारीही अवाक झालेत. मात्र, साखरेच्या भावात कोणत्या कारणाने दरवाढ झाली याची माहिती व्यापाऱ्यांना नाही. त्यामुळे किरकोळ बाजारातही साखर ४० रुपयांच्या घरात पोहोचली. दरम्यान, गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने साखर उद्योगाला सात हजार कोटीचं पॅकेज जाहीर केले. साखर उद्योगासमोर अडचणी लक्षात घेऊन हे पॅकेच जाहीर करण्यात आले. मात्र, असे असताना साखरेच्या दरात अचानक भाववाढ करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


४० रुपयांच्या घरात साखर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात साखरेला एका क्विंटलमागे ३५५० रुपये मोजावे लागत होते. यामध्ये ५ टक्के जीएसटीचा समावेश आहे. त्यामुळे घाऊक बाजारात साखर ३५ ते ३८ रुपयांच्या घरात पोहोचली. परिणामी किरकोळ बाजारात साखर अचानक ४० रुपयांच्या घरात पोहोचली. मात्र, ही दरवाढ अचानक कशी करण्यात आली, याबाबत व्यापाऱ्यांना कारण सांगण्यात आलेले नाही. मनमानी पद्धतीने साखरेच्या दरात वाढ करण्यात आल्याने अनेक घाऊक व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.


सरकारकडून २९००चा भाव


दरम्यान, सरकारने २९०० रुपये साखरेला दर दिला असताना अचानक ३५५० रुपये क्विंटलला दर का लावला गेला, याबाबत कोणीही काहीही बोलायला तयार नाही. गेल्या आठवड्यात हा दर कायम होता. मात्र, आज साखरेच्या या दरात २०० रुपयांनी अचानक घट झाली. आज क्विंटलला ३३३० रुपये साखरेला मोजावे लागलेत. घाऊक बाजारात आज २०० रुपये साखर स्वस्त झाली. ३३.३० ते ३४ रुपये साखरेला भाव घाऊक बाजारात असल्याने किरकोळ बाजारात साखर ३५ ते ३७ रुपये दराने मिळत आहे. याआधी किरकोळ बाजारात साखर ३२.५० ते ३३ रुपये होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून साखरेच्या दरात अचानक तीन ते पाच रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला कमी दर


दरम्यान, साखरेला अचनाक मागणी वाढल्याने साखर कारखान्यांनी ही भाववाढ केल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, साखर निर्यात करण्यासाठी साखरेचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत १९०० रुपये भाव आहे. त्यामुळे कारखान्यांना साखर निर्यात करणे शक्य होत नाही. जर साखर निर्यात करायची असेल तर जवळपासू २००० ते २१५० रुपये खर्च येतो. त्यामुळे नुकसान करुन साखर निर्यात करणे शक्य नाही. त्यामुळे साखर पडून आहे. त्यातच सरकारने साखरेचा किमान दर २९ रुपये किलो ठरवून दिला आहे. तर दुसरीकडे ३० लाख टन साखर बफर स्टॉक केल्याने देशातंर्गत बाजारपेठेतील दर स्थीर राहाण्याला मदत होईल, अशी अपेक्षा असताना साखरेचे दर वाढल्याने नाराजी व्यक्त होत आहे.