मुंबई: मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले शिवसेना नेते भास्कर जाधव यांना सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. विधानसभेतील कामकाजादरम्यान बुधवारी हा प्रसंग घडला. यावेळी भास्कर जाधव यांनी सभागृहात कोकणाच्या समस्या मांडणारे भाषण केले. यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी उभे राहत भास्कर जाधव यांचे अभिनंदन केले. एवढेच नव्हे तर मुनगंटीवार यांनी त्यांना थेट भाजपमध्ये येण्याची ऑफरही देऊन टाकली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भास्कर जाधव तुम्ही अत्यंत छान बोललात. तुम्ही कोकणाच्या विकासाबाबत त्यांना काय वाटतं याबाबत अतिशय पोटतिडकीने भूमिका मांडली. कोकणचा विकास करण्यासाठी तुम्ही साडेचार हजार कोटींची मागणी केलीत. अशावेळी इथे अर्थमंत्री असणे गरजेचे आहे. मात्र, अर्थमंत्री सभागृहात हजर नाहीत. इथे तुम्ही जे बोलत आहात त्याचे गांभीर्य कुणाला नाही. तुमच्या नावात म्हणजेच भास्कर जाधव या नावात भास्करचा B आणि जाधवचा J आहेच. आता त्याला प्रगतीचा P जोडा आणि BJP मध्ये या, असे मुनगंटीवार यांनी म्हटले. सुधीर मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. 


भास्कर जाधव आप को गुस्सा क्यों आता है?


पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेल्या भास्कर जाधव यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला अलविदा करून पुन्हा एकदा शिवबंधन हातात बांधले होते. शिवसेनेत आल्यावर मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे भास्कर जाधव खूपच नाराज झाले होते. मंत्रिपदासाठी माझा विचार का झाला नाही, हे मी उद्धव ठाकरे यांना विचारणारच, असे जाधव यांनी जाहीरपणे सांगितले होते. मात्र, शिवसेना नेतृत्वाने जाधव यांच्या नाराजीची विशेष दखल घेतली नव्हती.  यानंतरच्या काळात भास्कर जाधव यांनी उघडपणे नाराजी जाहीर करणे टाळले होते. 


'उद्धवजींनी चिंता करू नये, वेळ पडली तर आम्ही शिवसेनेला पाठिंबा देऊ'


मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या कोकण दौऱ्यावेळी भास्कर जाधव यांनी आपली नाराजी पुन्हा एकदा दाखवली होती. यावेळी त्यांनी भर व्यासपीठावर शिवसेना खासदार विनायक राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांचा हात झिडकारला होता. त्यामुळे भविष्यात भास्कर जाधव काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.