कडक उन्हाचा भाज्यांवरही परिणाम, दर वधारले
Vegetables Price Hike : उन्हाळा दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे. याचा माणसाच्या शरीरावर जसा परिणाम होतो तसाच अगदी भाज्यांवरही झाला आहे. उन्हामुळे पालेभाज्यांना लागणारे पोषक वातावरण आणि कमी पडत असून उत्पादनात घट झाली आहे. भाज्यांच्या दरात दुपटीने दर वाढले आहेत.
उन्हाळ्याचा परिणाम सगळ्याच भाज्यांवर झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पालेभाज्या, कोथिंबीर, शिमला मिरची आणि काकडीच्या दरात 12-15 रुपयांनी दरवाढ झाली आहे. उन्हाळ्यात आहारात भाज्यांच प्रमाण सर्वाधिक असतं पण त्याचा दर्जा खालावला आहे.
अवकाळी पावसाचा फटका
राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. उन्हाळ्यात मिळणाऱ्या पालेभाज्यांना मोठा फटका बसला आहे. तर अनेक जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती ओढावली आहे. यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने आणि इतर कारणांमुळे दर वाढले आहेत. त्यातच उन्हाच्या झळांमुळे भाजीपाला लवकर सुकत असल्याने ग्राहक तो खरेदी करत नाही. त्याचा फटका भाजी विक्रेत्यांना सहन करावा लागत आहे.
पालेभाज्यांचा दर वधारला
पालेभाज्याच्या 80-100 गाड्या आवक होती ती आता 50-55 गाड्या इतकी होत आहे. मागील आठवड्यात दोन लाख सात हजार क्विंटल तर आज एक लाख 18 हजार क्विंटल कोथिंबीर दाखल झाली आहे. फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या किंमतींनी महिलांच बजेट कोलमडलं आहे. कोथिंबीरची एक जुडी आता 50 रुपयांना मिळते. पूर्वी हा भाव 20-25 रुपये होता. शेपू पण 25 रुपयांहू 50 रुपयांवर पोहचला आहे. 60-80 रुपयांना मिळणारी मिरची आता 100 रुपये दराने विक्री होत आहे.
किचन बजेट कोलमडलं
उन्हाळाच्या दिवसांमध्येच घरगुती गोष्टी अनेक असतात. अशातच मुलांना शाळेला सुट्टी असल्याने त्याचा परिणामही आर्थिक बजेटवर होतो. असं सगळं असताना किचन बजेटही कोलमडलं आहे. कारण उन्हाळ्यात भाज्यांच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या सगळ्याचा भार महिलांच्या किचनवर आला आहे. यामुळे त्यांचं किचन बजेट बिघडल्याचं देखील सांगण्यात येत आहे.
भाज्यांचे दर
कोथिंबीर 50 रुपये जुडी
शेपू 50 रुपये जुडी
मिरची 1 किलो 100 रुपये
काकडी 20-30 रुपये अर्धा किलो
हिरवा वाटाणा 110 रुपये किलो
एपीएमसी मार्केट
एपीएमसी मार्केटमधील व्यावसायिकेने दिलेल्या माहितीनुसार वातावरणातील कडाका वाढल्यानंतर भाज्यांचा पुरवठा कमी झाला आहे. तसेच भाज्यांचा दरही वाढल्याचा परिणाम मागणीवर झाला आहे. एपीएमसी हे मार्केट वाशीमध्ये असून येथे महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली आणि कर्नाटकातून भाज्या येतात. एपीएमसी मार्केटमध्ये दिवसाला 577 भाज्यांनी लोडेड गाड्या उतरवल्या जातात पण उन्हाळ्यात मात्र हे प्रमाण 296 वर आले आहे. एका व्यावसायिकेने दिलेल्या माहितनुसार मे ते जून महिन्यापर्यंत हा असाच परिणाम होताना दिसतो.