राज्यघटनेतील तत्वे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक - शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत.
मुंबई : महाराष्ट्रामधील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला. उद्या म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. हा निकाल योगायोगाने संविधानदिवस साजरा होत असताना आल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान झाला, याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया पवार यांनी व्यक्त केली. तसे त्यांनी ट्विट केले आहे.
राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. कारण राज्यामधील घोडेबाजार थांबवण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी घेणे गरजेचे असल्याचे सांगत न्यायलयाने बहुमत चाचणी घेण्याचा आदेश दिला आहे. उद्या पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपथविधी पूर्ण करण्यात यावा असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. विश्वासदर्शक ठरावाचे लाईव्ह चित्रिकरण करण्यात यावे, असेही न्यायालयाने स्पष्ट बजावले आहे.
लोकशाही मूल्यांचे रक्षण होणे आवश्यक आहे. लोकांना चांगले सरकार मिळणे हा मुलभूत अधिकार आहे. तसेच घोडेबाजार रोखण्यासाठी न्यायालयाला काही आदेश देणे गरजेचे होते. त्यामुळे कोणतेही गुप्त मतदान न घेता उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचा आदेश आम्ही देत आहोत, असे न्यायाधिशांनी स्पष्ट केले.