सुशांतसिंग प्रकरण सीबीआयकडे, `घटनातज्ज्ञांनी विचारमंथन करावं`, गृहमंत्र्यांचं वक्तव्य
सुशांतसिंग राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : सुशांतसिंग राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करतो, जे सहकार्य लागेल, ते राज्य सरकार देईल, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत. सुप्रीम कोर्टाला पोलिसांच्या तपासात कोणताही दोष आढळला नाही, मुंबई पोलिसांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. योग्य पद्धतीने तपास झाला आहे. काही जण मुंबई पोलिसांबद्दल बोलत होते, असं वक्तव्य अनिल देशमुख यांनी केलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत संघ राज्याची संकल्पना मांडली आहे, त्याबाबत घटनातज्ज्ञांनी विचारमंथन करावं, असंही अनिल देशमुख म्हणाले आहेत. तसंच विरोधी पक्षाचे नेते या संपूर्ण प्रकरणाचं बिहारमधल्या निवडणुका लक्षात घेऊन राजकारण करत आहेत, असा आरोपही अनिल देशमुख यांनी केला आहे.
दुसरीकडे सीबीआयकडे तपास देण्यासाठी राज्याची परवानगी लागते किंवा न्यायालय ती परवानगी देते. न्यायालय अपवादात्मक परिस्थितीमध्ये प्रकरण सीबीआयला देते. यामध्ये घटनात्मक ढाच्याला धक्का लागला आहे का? याबाबत घटनातज्ज्ञांनी निकालाचा नीट अभ्यास करुन मत व्यक्त करावं, असं शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले आहेत.
सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बैठक बोलावली होती. मंत्रालयात गृहमंत्री, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग, विधि व न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. याआधी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक पार पडली आहे. सुशांत सिंग प्रकरणी बैठक झाल्याचं सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही बैठक झाली.