मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. पण भाजप हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष बनला आहे, तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. भाजप आणि शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा पेच अजूनही सुटला नसला तरी प्रशासनाकडून शपथविधीची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ३१ ऑक्टोबरला नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासन महालक्ष्मी रेसकोर्सचा विचार करत असल्याचं बोललं जात आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये मंत्रिपदाचं वाटप निश्चित झाल्यानंतर शपथविधीची तयारी सुरु केली जाईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेने त्यांच्या विजयी उमेदवारांची बैठक मातोश्रीवर बोलावली आहे. या बैठकीत ५०-५० टक्के फॉर्म्युल्यावर ठाम राहायचं की १९९५ चा फॉर्म्युला राबवायचा. तसंच काँग्रेस राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा घेवून सरकार स्थापन केल्यास काय होईल? याबाबतही आमदारांचा कल घेतला जाईल. तसंच या बैठकीत विधीमंडळ गटनेतेपदी आदित्य ठाकरे यांची निवड होण्याचीही शक्यता आहे.


पहिल्यांदाच निवडणूक लढलेले युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे वरळीतून निवडून आले आहेत. यानंतर वरळीमध्ये भावी मुख्यमंत्री असं लिहिलेले आदित्य ठाकरेंचे पोस्टर लावण्यात आले.


दुसरीकडे काँग्रेसनेही शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सूचक विधान केलं आहे. शिवसेनेने आमच्याशी अजून संपर्क साधला नाही, पण त्यांनी समर्थन मागितलं तर आम्ही पक्षश्रेष्ठींची बोलून निर्णय घेऊ, असं प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही शिवसेनेला ऑफर दिली. मुख्यमंत्रीपद हवं का उपमुख्यमंत्रीपद हे शिवसेनेने ठरवावं, असं  भुजबळ म्हणाले होते.


काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला, तर भाजपला राज्यात सत्तेपासून लांब राहावं लागू शकतं. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-शिवसेना महायुतीचं सरकार स्थापन होणार असल्याचं निकाल लागल्याच्या दिवशीच स्पष्ट केलं होतं.