देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: भारतीय राष्ट्रध्वज हा कोट्यवधी भारतियांसाठी अस्मितेचा विषय आहे. काही अपवाद वगळता त्याचा अन्य कोणत्याही गोष्टींसाठी वापर करणे कायद्याने दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. असे असले, तरी या संवेदनशील विषयाचे गांभीर्य न ठेवता ॲमेझॉन, इंडियामार्ट, फेमअसशॉप, मिंत्रा, स्नॅपडील, फ्लिपकार्ट यांसारख्या ‘इ-कॉमर्स’ संकेतस्थळांवरून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १५ ऑगस्टच्या निमित्ताने भारतीय राष्ट्रध्वजाचे रंग असलेले ‘मास्क’ बनवून त्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री चालू आहे. त्यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी. तसेच अशा मास्कची विक्री, उत्पादन आणि वितरण होणार नाही या दृष्टीने शासनाने तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रध्वज हे काही सजावट करण्याचे माध्यम नाही. अशा प्रकारचे मास्क वापरल्यास शिंकणे, त्याला थुंकी लागणे, तो अस्वच्छ होणे, तसेच शेवटी वापरानंतर कचर्‍यात टाकणे इत्यादींमुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होणार आहे आणि असे करणे हे ‘राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा 1950’, कलम 2 व 5 नुसार; तसेच ‘राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971’चे कलम 2 नुसार व ‘बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950’ या तिन्ही कायद्यांनुसार दंडनीय गुन्हा आहे. तरी शासनाने त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी आमची मागणी आहे.

हिंदू जनजागृती समिती गेली १८ वर्ष ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ ही मोहीम राबवत आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने वर्ष 2011 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देतांना ‘शासनाने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना आणि त्याचा अवमान रोखावा’ असे निर्देश शासनाला दिले होते.