मुंबई : मुंबईतील जुन्या अथवा दुरुस्ती सुरु असलेल्या रेल्वे उड्‌डाण पुलांचा, गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये वापर करताना गणेश भक्तांनी तसेच जनतेने योग्य काळजी घ्यावी. या पुलांचा मूर्ती आगमन अथवा विसर्जन प्रसंगी उपयोग करताना पुलांवर अतिभार होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच संपूर्ण गणेशोत्सव कालावधीमध्ये महानगरपालिका प्रशासन तसेच वाहतूक पोलीस यांनाही या कामी सहकार्य करावे, अशीदेखील विनंती करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोविड १९ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने देखील केले आहे. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये, यासाठी योग्य त्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. यंदा मिरवणुका टाळाव्यात, उत्सवाच्या निमित्ताने गर्दी होणार नाही याचे भान राखून, उत्सवाचे पावित्र्य जपून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन यापूर्वीच करण्यात आले आहे. त्यास मुंबईकरांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळतो आहे. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा साधेपणावर भर तर दिला आहेच, समवेत मूर्ती आगमनाच्या मिरवणुका देखील आयोजित केल्या नाहीत, या सहकार्याच्या भावनेबद्दल महानगरपालिका प्रशासन मंडळांचे तसेच जनतेचे आभारी आहे. 


दरम्यान, महानगरपालिकेच्‍या हद्दीतील सर्व गणेश भक्‍त, गणेश मंडळांसह जनतेला सूचित करण्‍यात येते की, मुंबईतील रेल्वे मार्गांवरील काही पूल (Bridges) हे ब्रिटिशकालीन असून अतिशय जुने झाले आहेत. काही पुलांची दुरुस्तीची कामे सुरु आहेत किंवा काहींची कामे पावसाळ्यानंतर सुरु करण्यात येणार आहेत. काही पुलांवर अवजड वाहनांना प्रतिबंध आहे तर काहींवर वाहतुकीस प्रतिबंध आहे. अशा सर्व बाबी लक्षात घेता सर्व गणेशभक्तांनी या पुलांचा गणेश मूर्ती आगमन आणि विसर्जनासाठी उपयोग करताना विविध बाबींची काळजी घ्यावी.


विशेषत: मिरवणुका टाळावयाच्या असल्याने मूर्ती आगमन/विसर्जनाच्या वेळेस पुलांवर गर्दी करु नये. पुलांवर थांबून राहू नये. करीरोड उड्डाणपूल व ऑर्थररोड उड्डाणपूल किंवा चिंचपोकळी उड्डाणपूल या पुलांवर एका वेळेस भाविकांचे व वाहनांचे मिळून एकंदर १६ टनापेक्षा अधिक वजन होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. पुलांवर ध्वनिक्षेपकांचा वापर करण्यात येवू नये. पुलावर जास्त वेळ न थांबता त्वरित पुलावरून पुढे जावे. पोलीस व महानगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱया सुचनांचे पालन करावे, अशी विनंती करण्यात येत आहे. 


सदर सुचनांचे पालन करणे आवश्यक असलेल्या पुलांची नांवे पुढीलप्रमाणे आहेत.
मध्‍य रेल्‍वेवरील १) घाटकोपर रेल्वे उड्डाण पूल, २) करीरोड रेल्वे उड्डाण पूल, ३) ऑर्थर रोड  रेल्वे उड्डाण पूल किंवा चिंचपोकळी रेल्वे उड्डाण पूल, ४) भायखळा रेल्वे उड्डाण पूल


तसेच, पश्चिम रेल्वेवरील १) मरीन लाईन्‍स रेल्वे उड्डाण पूल, २) सँडहर्स्‍ट रोड रेल्वे उड्डाण पूल (ग्रॅन्‍ट रोड व चर्नी रोडदरम्यान), ३) फ्रेंच रेल्वे उड्डाण पूल (ग्रॅन्‍ट रोड व चर्नी रोडदरम्यान), ४) केनडी  रेल्वे उड्डाण पूल (ग्रॅन्‍ट रोड व चर्नी रोडदरम्यान), ५) फॉकलॅण्ड रेल्वे उड्डाण पूल (ग्रॅन्‍ट रोड व मुंबई सेंट्रलदरम्यान), ६) बेलासीस, मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ, ७) महालक्ष्‍मी स्‍टील रेल्वे उड्डाण पूल, ८) प्रभादेवी- कॅरोल रेल्वे उड्डाण पूल, ९) दादर - टिळक रेल्वे उड्डाण पूल
IFrame


यांचा उपयोग करताना काळजी घ्यावी. स्थानिक स्तरावर प्रदर्शित सुचनांचे योग्य पालन करावे.   विशेषत: मुंबई शहर जिल्ह्यातील गणेश भक्तांनी चिंचपोकळी रेल्वे उड्डाण पूल (आर्थर रोड रेल ओव्‍हरब्रीज) आणि करी रोड रेल्वे उड्डाण पूल पार करताना सदर सूचनांचे काळजीपूर्वक पालन करावे. गणेशोत्‍सवातील संपूर्ण कामकाज व्‍यवस्थितरित्‍या पार पाडण्यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेस व वाहतूक पोलिसांनाही योग्य ते सहकार्य करावे, असे पुन्हा एकदा आवाहन करण्यात येत आहे.