मुंबई: नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांनी 40 पेक्षा अधिक आमदार फोडून बंडाचा झेंडा फडकवला आहे. जवळपास दोन तृतीयांश आमदार शिंदेंसोबत असल्यानं त्यांनी पक्षाच्या चिन्हावर दावा केला आहे. मुख्यमंत्रिपदासह शिवसेना पक्षप्रमुखपदावरही पाणी सोडावं लागतं की काय, अशी वेळ उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) आलीय. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विभागप्रमुखांची बैठक मातोश्रीवर पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विभागप्रमुखांना पक्ष बांधणीचे आदेश दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे यांनी विभागप्रमुखांना विभागवार मेळावे घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर शाखा शाखा पिंजून काढण्याचे आदेश दिले आहेत. आपण हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यांवर आजही कायम असल्याचं पटवून देण्यात सांगितलं आहे. तसेच जे गेले त्यांचा विचार करू नका, असंही सांगितलं आहे. पक्षबांधणीसाठी योगदान देण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर उद्या शुक्रवारी दुपारी 1 वाजता सर्व जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची बैठक शिवसेनाभवनमध्ये आयोजित केली आहे.


दुसरीकडे, 36 आमदारांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटाकडून आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे. पक्षांतर बंदी कायद्यामुळे दोन तृतियांश आमदार असणं गरजेचं आहे, आमदार संख्या 36 असल्यास या कायद्यापासून सूट मिळते. त्यामुळे ही संख्या पूर्ण होईपर्यंत गेले दोन दिवस एकनाथ शिंदे गटाने वाट पाहिली.