मुंबई :  कोरोनाविरुद्धच्या लढाईत तब्बल दीड हजार कोटी रुपयांची भरघोस आर्थिक मदत देणाऱ्या रतन टाटा यांच्या उद्योग समुहानं आपल्या सामाजिक दायित्वाचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. कोरोनाच्या संकटात अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या महापालिकेचे डॉक्टर, नर्स आदी आरोग्य सेवकांना ताज हॉटेलमधून जेवण पुरवण्याचा उपक्रमही त्यांनी सुरु केला. पण आता तर डॉक्टर आणि नर्स यांना कुलाब्यातील हॉटेल ताज, बांद्र्यातील हॉटेल ताज लँण्ड्स एन्डसह मुंबईतील पाच पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्थाही केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना रोखण्यासाठी सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना टाटा समुहानं पहिल्यापासून साथ दिली आहे. कोरोनाविरोधात लढ्यासाठी टाटा ट्रस्टनं ५०० कोटी रुपयांची मदत दिली आहे. तर टाटा सन्सकडून एक हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. १५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत करून टाटा थांबले नाहीत, तर वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी कोरोनाविरोधी लढ्यात आपला सहभाग सुरुच ठेवला आहे.


आर्थिक मदत आणि जेवण अशी व्यवस्था केल्यानंतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्स यांची टाटा समुहाच्या मुंबईतील ५ पंचतारांकीत  हॉटेलमध्ये राहण्याची सोय देखिल करण्यात आली आहे. कुलाबा येथील हॉटेल ताज महल पॅलेस, सांताक्रुजमधील ताज, द प्रेसिडेंट, अंधेरी एमआयडीसीतील जिंजर आणि बांद्र्यातील हॉटेल ताज लँण्ड्स एन्ड या हॉटेलमध्ये अशी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेडच्या प्रवक्त्यानं दिली आहे.


लॉकडाऊन असल्यानं सध्या सगळे व्यवहार ठप्प आहेत. तर हॉटेल्सही बंद आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या महापालिकेच्या डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांचे यांचे हाल होऊ नयेत म्हणून ताज हॉटेलमधून जेवण देण्याची व्यवस्थाही करण्यात आली.


राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करून टाटा यांच्या या मदतीचं कौतुक केलं आहे. समाज आणि देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटकाळात टाटांच्या दातृत्वाचं सोशल मीडियावरही कौतुक होत आहे.