मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान मातोश्रीनजीक काही अंतरावर कोरोनाची धडक
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्रीनजीक असलेल्या चहावाल्याला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्रीनजीक असलेल्या चहावाल्याला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. ही चहाची टपरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊसजवळ आहे. मुंबईतील वांद्रे कलानगरमधील या भागात यामुळे खळबळ उडाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्री संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे.
मातोश्रीच्या गेट क्रमांक २ च्या काही अंतरावर हा चहावाला आहे. हा चहावाला कोरोना बाधित झाल्याचं सांगण्यात येत आहे.
थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानानजीक एकाला कोरोनाची लागण झाल्याने, कोरोनाने आपल्या जवळपास किती पाय पसरायला सुरूवात केली आहे, याचा अंदाज येत आहे.
मातोश्रीजवळील रस्त्यांवर आज दुपारपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात रस्ते आणि मातोश्री परिसरात फवारणीही करण्यात आली आहे.
हा संपूर्ण परिसर मुंबई महापालिकेकडून आज दुपारीच सॅनेटाईझ करण्यात आला आहे. आज दुपारपासूनच मातोश्रीच्या जवळ यंत्रणेने आपलं काम सुरू केल्यानंतर, नेमकं काय झालं अशी विचारणा करण्यात येत होती, यानंतर या परिसरातील चहावाल्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.